नवी दिल्ली – झूम कॉलवर एकाच वेळी ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्यानंतर Better.com चे मूळ भारतीय असलेले सीईओ विशाल गर्ग(Vishal Garg) चांगलेच चर्चेत आले. पहिल्यांदाच अशाप्रकारे एका ऑनलाईन मिटींगवेळी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात आले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी बॉसच्या या कृत्यावर टीका केली. त्यानंतर आता विशाल गर्गवरही कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणाऱ्या सीईओ विशाल गर्ग यांना कंपनीनं सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं आहे. अमेरिकेच्या डिजिटल मॉर्टगेज कंपनीच्या ईमेलच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे. विशाल गर्गच्या जागी चीफ फायनॅन्शियल ऑफिसर केविन रयान(Kevin Ryan) यांना कंपनीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच बोर्डाला रिपोर्ट करण्याची जबाबदारीही केविन यांच्यावर टाकली आहे.
विशाल गर्गने ३ मिनिटांत झूम कॉलवरुन ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं होतं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर जगभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर कंपनीने विशाल गर्ग यांना सुट्टी पाठवण्याचा निर्णय घेतला. कंपनीने बोर्डासह लीडरशिप आणि कल्चरल एसेसमेंटची जबाबदारी एक इडिपेंडेंट थर्ड पार्टीला दिली आहे. या प्रकरणावर Better.comने अद्यापही कुठलीही टिप्पणी केली नाही.
जगभरातून टीकास्त्र
कुणालाही नोकरीवरुन कमी करणं हे पहिल्यांदा घडलं नाही. परंतु एका झूम कॉलवरुन ९०० कर्मचाऱ्यांना काढून टाकणं हे पहिल्यांदा पाहिलं आहे. ज्याने कुणी विशाल गर्गचा व्हिडीओ पाहिला त्याने विशाल गर्गला खडूस बॉस असल्याची उपमा दिली. कंपनीचे अनेक कर्मचारी विशाल गर्गच्या निर्णयाने दुखावले गेले. हा व्हिडीओ सोशल मीडियात पसरला. त्यानंतर विशाल गर्ग याने केलेल्या कृत्यावर माफी मागितली.
कोण आहे विशाल गर्ग?
विशाल गर्ग हे बेटर.कॉम कंपनीचे फाऊंडर आणि सीईओ आहेत. ही कंपनी एक डिजिटल फर्स्ट होम ओनरशिप कंपनी आहे. गर्ग यांच्या लिंक्डइनवरच्या बायोडाटानुसार ते एक गुंतवणूक कंपनी वन झीरो कॅपिटलचे संस्थापक पार्टनरही आहेत. दरम्यान, विशाल गर्ग हे या वर्षाच्या सुरवातीला कोरोनाच्या साथी दरम्यान न्यूयॉर्कमधील शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधेसाठी १५ कोटी रुपयांची मदत केल्याने प्रसिद्धीच्या झोतात आले होते. या पैशांचा वापर गरीब मुलांसाठी आयपॅड, इंटरनेट, पुस्तके, ड्रेससारख्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी करण्यात आला होता.