नवी दिल्ली : वोडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी येथे दिली. या विलीनीकरणास कंपनी राष्टÑीय कायदा लवाद (एनसीएलटी) व सेबीने आधीच मान्यता दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.
देशात ५जी मोबाइल सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या (कोआई) वतीने येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना अरुणा सुंदरराजन यांनी ही माहिती दिली.
सूत्रांनी सांगितले की, विलीनीकरणानंतर तयार होणाऱ्या नव्या कंपनीसाठी वोडाफोन व आयडियाने गेल्याच आठवड्यात समितीची घोषणा केली. कुमार मंगलम बिर्ला हे अ-कार्यकारी चेअरमन, तर बालेश शर्मा सीईओ असतील. विलीनीकृत कंपनी ग्राहक आणि महसुलाच्या दृष्टीने भारतातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी ठरणार आहे. जूनअखेरपर्यंत हे विलीनीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी सांगितले की, दूरसंचार क्षेत्रातील तंत्रज्ञान प्रचंड वेगाने बदलत आहे. २जी तंत्रज्ञानावर आधारित मोबाइल फोनवर फक्त बोलण्याची सुविधा उपलब्ध होती. त्यानंतर, आलेल्या ३जी तंत्रज्ञानात व्हिडीओ पाहण्याची सोय होती. तथापि, ३जी तंत्रज्ञानाचा वापर सुरू होण्यापूर्वीच रिलायन्स जिओने ४जी तंत्रज्ञान आणले. ४जी तंत्रज्ञानाबरोबर ही सेवा स्वस्तही झाली. आता ५जी तंत्रज्ञानाची चर्चा सुरू झाली आहे. ५जीमुळे मोबाइल इंटरनेटची गती आणि दर्जा दोन्हींत सुधारणा होईल.
वोडाफोन-आयडिया लवकरच विलीन
वोडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 02:49 AM2018-03-28T02:49:37+5:302018-03-28T02:49:37+5:30