देशातील तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाचे एफपीओ शेअर आज शेअर बाजारात लिस्ट झाले. एफपीओमध्ये कंपनीचे शेअर्स ११ रुपयांना अलॉट करण्यात आले होते. कामकाजादरम्यान, शेअर्स १३ रुपयांच्या वर गेले. लिस्टिंगनंतर आदित्य बिर्ला समूहाचे कुमार मंगलम बिर्ला यांनी प्रतिक्रिया दिली.
"सरकारचे रिफॉर्म पॅकेज व्होडाफोन-आयडियाच्या या टप्प्यापर्यंतच्या प्रवासात महत्त्वाचं ठरलं आहे. संपूर्ण क्षेत्राला चालना मिळाली आहे. मी पंतप्रधान मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचं नेतृत्व आणि बाजारात थ्री-प्लेअर मार्केटचं जतन करण्याच्या त्यांच्या स्पष्ट वचनबद्धतेबद्दल धन्यवाद देतो," असं कुमार मंगलम बिर्ला म्हणाले.
'हे नवीन जीवन'
"व्होडाफोन आयडियासाठी हे एक नवीन जीवन आहे. आम्ही अतिशय आनंदी आहोत. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी एक उत्कृष्ट सेवा प्रदाता बून," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आयपीओ झालेला सात पट सबस्क्राईब
व्होडाफोन आयडियाचा एफपीओ जवळपास सात पट सबस्क्राइब झाला होता. यामागे संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या प्रतिसादानं महत्त्वाची भूमिका बजावली. Vodafone Idea ला एफपीओ अंतर्गत एकूण ८८,१२४ कोटी रुपयांच्या बोली मिळाल्या, पण एफपीओ ऑफरनुसार, कंपनी फक्त १२,६०० कोटी रुपये राखून ठेवेल. एफपीओ सुरू होण्यापूर्वी कंपनीनं ४९० कोटी शेअर्स विकून अँकर गुंतवणूकदारांकडून ५,४०० कोटी रुपये उभे केले होते.