Join us  

Vodafone Idea Share: गुंतवणूकदार कंगाल! ६५ ₹वरुन ७.४५ ₹वर आला शेअर; घसरण थांबेना अन् कुणी मदतही करेना!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 12:23 PM

Vodafone Idea Share: या कंपनीचे शेअर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. तुम्ही तर घेतला नाही ना हा शेअर? जाणून घ्या...

Vodafone Idea Share: आताच्या घडीला शेअर बाजारात पडझड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवरील घडामोडींचा तसेच कोरोनाच्या उद्रेकाचा नकारात्मक परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसत आहे. असे असले तरी काही कंपन्या दमदार कामगिरी करून गुंतवणूकदारांना श्रीमंत करताना दिसत आहेत. मात्र, काही कंपन्यांचे शेअर गाळात चालले असून, पुन्हा उभारी घेताना दिसत नाहीत. यातच एका कंपनीचा ६५ रुपयांवर असलेला शेअर ७.४५ रुपयांवर आला आहे. यामुळे प्रचंड मोठा तोटा सहन करावा लागला असून, गुंतवणूकदार कंगाल झाल्याचे सांगितले जात आहे. 

नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ झाली आहे, मात्र या दरम्यान व्होडाफोन आयडिया या कंपनीचे शेअर ५ टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत आहेत. व्होडाफोन आयडियाचे शेअर्स १५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरले आहेत. तोट्यात चाललेल्या कंपनीला सरकार, बँका किंवा तिच्या प्रवर्तकांकडून निधी उभारण्यात यश मिळत नाही. तसेच त्यामुळे या कंपनीला मदत करायला कुणी तयार नसल्याचे बोलले जात आहे. 

...तर कंपनीला आपले अस्तित्व टिकवणे कठीण होईल

एका रिपोर्टनुसार, कंपनीने अलीकडेच स्थानिक बँकांकडून किमान ७ हजार कोटी रुपयांच्या आपत्कालीन निधीची मागणी केली होती. कंपनीने भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक , HDFC बँक आणि IDFC फर्स्ट बँक, या बँकांकडे कर्जासाठी संपर्क साधला होता. मात्र, वित्तीय संस्था त्याच्या प्रवर्तकांकडून भांडवल वाढवण्याची किंवा सरकारकडून कर्ज इक्विटी रुपांतरणाची वाट पाहत आहेत. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत व्होडाफोन आयडियाच्या प्रवर्तकांकडून नवीन भांडवल आले नाही, तर कंपनीला आपले अस्तित्व टिकवणे कठीण होईल, असा दावा काही अहवालांतून करण्यात आला आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

दरम्यान, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या जाणकारांनी सप्टेंबर तिमाही निकालांच्या अपडेटमध्ये संथ गतीने होत असलेले ५G रोलआउट, तसेच सतत ग्राहक कमी यामुळे कमाई कमी होण्याची अपेक्षा असल्याचा अंदाज वर्तवला होता. व्होडाफोन-आयडियाच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. गेल्या सहा महिन्यात स्टॉक ६ टक्क्यांनी तर गेल्या वर्षभरात शेअर्सच्या किंमतीत सुमारे ५० टक्क्यांनी घट झाली आहे.

(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :शेअर बाजारव्होडाफोन आयडिया (व्ही)गुंतवणूक