Join us  

Vodafone-Ideaच्या शेअरमध्ये ८३% पर्यंत घसरणीचा अंदाज, ब्रोकरेजनं दिलं ₹२.५चं टार्गेट; स्टॉक आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 2:40 PM

Vodafone Idea Share Price:  आज शेअर बाजाराचा व्यवहार सुरू होताच व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये १४ टक्क्यांची मोठी घसरण झाली. पाहा ब्रोकरेजनं काय म्हटलंय.

Vodafone Idea Share Price:  आज शेअर बाजाराचा व्यवहार सुरू होताच व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये १४ टक्क्यांची मोठी घसरण झाली. यानंतर शेअर किंचितसा सावरला. विदेशी ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सच्या रिपोर्टमध्ये व्होडाफोन आयडियाच्या मूल्यांकनावर चिंता व्यक्त करण्यात आली होती. ब्रोकरेज कंपनीनं व्होडाफोन आयडियाच्या शेअरला 'सेल' रेटिंग दिलं असून केवळ अडीच रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. यामुळे व्होडाफोनआयडियाच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या बंद किमतीपेक्षा ८३ टक्क्यांची घसरण अपेक्षित आहे.

ब्रोकरेजनं आपल्या अहवालात म्हटलंय की, कंपनीला फ्री कॅश फ्लोच्या पातळीवर ब्रेक-इव्हन मिळविण्यात आणि मार्केट शेअर मिळविण्यात अडचणी येत आहेत. गोल्डमन सॅक्सच्या विश्लेषकांनुसार व्होडाफोन आयडियासाठी शक्यता अत्यंत निराशाजनक दिसत आहेत. येत्या ३-४ वर्षांत कंपनीचा मार्केट शेअर सुमारे ३ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलंय.

व्होडाफोन आयडियासाठी सर्वोत्तम परिस्थितीचा विचार केल्यास एजीआर थकबाकी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्याच्या बाजूनं येतो आणि थकित रकमेत ६५ टक्क्यांची कपात होते. त्याचबरोबर टॅरिफमध्ये सातत्यानं दरवाढ व्हायला हवी आणि नजीकच्या काळात सरकारला कोणतंही रिपेमेंट करावं लागू नये. या परिस्थितीतही व्होडाफोनच्या शेअरची किंमत १९ रुपयांपेक्षा जास्त दिसत नसल्याचं ब्रोकरेज कंपनीनं म्हटलंय.

आणखी काय म्हटलं ब्रोकरेजनं?

ब्रोकरेजनं असंही म्हटलंय की कंपनीची अलीकडील फंड जमवण्याची प्रक्रिया देखील त्याच्या बाजारातील हिस्सा कमी होण्यापासून रोखण्यासाठी अपुरी ठरेल. २०२६ पासून स्पेक्ट्रम आणि एजीआरशी संबंधित मोठी पेमेंट्सदेखील सुरू होतील. गोल्डमन सॅक्सचा अंदाज आहे की व्होडाफोन आयडियाचा फ्री कॅश फ्लो आर्थिक वर्ष २०३१ पर्यंत निगेटिव्ह राहील.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :व्होडाफोन आयडिया (व्ही)शेअर बाजार