Vodafone Idea Share Price: व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये (Vodafone Idea Share Price) आज २६ नोव्हेंबर रोजी प्रचंड वाढ झाली. कंपनीचा शेअर १७ टक्क्यांनी वधारून ८.२४ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. केंद्र सरकारच्या एका निर्णयानंतर टेलिकॉम कंपन्यांसाठी बँक गॅरंटीची अट माफ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम इतर टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्सवरही दिसून आला. या बातमीनंतर इंडस टॉवर्स लिमिटेडचा शेअर ५ टक्क्यांनी वधारला. तर भारती एअरटेलचा शेअर १ टक्क्यांनी वधारला होता.
काय आहे सरकारचा निर्णय?
२०२२ पूर्वी झालेल्या स्पेक्ट्रम लिलावात बँक गॅरंटीची अट रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. टेलिकॉम क्षेत्राची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी आणि कंपन्यांवरील आर्थिक बोजा कमी व्हावा या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिकॉम कंपन्यांनी २०२२ पूर्वी खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमला हा दिलासा लागू होईल. याचा सर्वाधिक फायदा अनेक दिवसांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या व्होडाफोन आयडियाला (Vodafone Idea) होण्याची शक्यता आहे.
... म्हणून घेतला निर्णय
हा निर्णय २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या कॅबिनेट सुधारणांचा विस्तार आहे, ज्यामध्ये २०२२ नंतर खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमवर बँक गॅरंटीची अट आधीच रद्द करण्यात आली होती. आता ही सवलत जुन्या स्पेक्ट्रमधारकांनाही लागू करण्यात आली आहे. टेलिकॉम क्षेत्रात स्थैर्य आणणं आणि कंपन्यांच्या वाढीस मदत करणं हा या पावलाचा उद्देश आहे.
यापूर्वी दूरसंचार कंपन्यांनी दूरसंचार विभागाकडे (डीओटी) अनिवार्य बँक गॅरंटी हटवण्याची मागणी केली होती. सरकारच्या या निर्णयामुळे टेलिकॉम क्षेत्राची कर्जाची समस्या कमी होईल आणि कंपन्यांना व्यवस्थापनाची चांगली संधी मिळेल, असा विश्लेषकांचा विश्वास आहे.
ही बातमी लिहिली जाईपर्यंत व्होडाफोन आयडियाचा शेअर एनएसईवर १७.३६ टक्क्यांनी वधारून ८.१८ रुपयांवर व्यवहार करत होता. मात्र, २०२४ मध्ये या शेअरमध्ये आतापर्यंत ५० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कंपनीचा व्यवसाय स्थिर होण्यास मदत होईल, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. मात्र, अजूनही अनेक आव्हाने त्यांच्यासमोर आहेत.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)