नवी दिल्ली: देशात लवकरच 5G इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. Airtel ची यासाठीची चाचपणी जवळपास पूर्ण झाली असून, देशातील काही ठिकाणी ५जी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. यातच आता व्होडाफोन आणि आयडिया कंपनीने ५जी सेवा देण्यासाठी तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. व्होडाफोन-आयडिया कंपनीच्या संचालक मंडळाने ४ हजार ५०० रुपयांच्या निधी उभारण्यास मंजुरी दिली असून, हा निधी ५ जी इंटरनेट सेवेसाठी असल्याचे सांगितले जात आहे.
खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडियाच्या संचालक मंडळाने प्रवर्तक समूहातील कंपन्यांना प्राधान्याने समभाग विकून ४,५०० कोटी रुपयांचा निधी उभारणीला मान्यता दिली आहे. कंपनीकडून तीन प्रवर्तक समूह कंपन्यांना दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या व्होडाफोन-आयडियाचे प्रत्येकी १३.३० रुपये किमतीप्रमाणे ३३८.३ कोटी समभाग देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
५जी लिलावात Vi होणार सहभागी!
देशात लवकरच ५ जी स्पेक्ट्रम संबंधित किंमत, त्यांची मात्रा आणि इतर अटींसह ध्वनिलहरींच्या लिलावाच्या पद्धतींबाबत शिफारशी जाहीर केल्या जाणार आहेत. या लिलावात सहभागासाठी तयारी म्हणून व्होडाफोन-आयडियाकडून मोठ्या निधीची उभारणी केली जात आहे. Vi ने आधीच्या थकबाकीचे समभागांमध्ये रूपांतरणाला मान्यता दिल्यामुळे केंद्र सरकारची व्होडा-आयडियामध्ये सर्वाधिक भागीदारी आहे. त्यापाठोपाठ व्होडाफोन समूहाकडे सुमारे ४४ टक्के आणि आदित्य बिर्लासमूहाकडे सुमारे २७ टक्के हिस्सेदारी आहे.
दरम्यान, चालू महिन्यात कंपनीने १४,५०० कोटी रुपयांच्या निधी उभारणीची घोषणा केली होती. आता व्होडाफोन-आयडियाच्या प्रवर्तक कंपन्या असलेल्या युरो पॅसिफिक सिक्युरिटीज, प्राइम मेटल्स आणि ओरियाना इन्व्हेस्टमेंट या तीन कंपन्यांकडून मिळणारा ४,५०० कोटी रुपयांचा निधी त्यामध्ये समाविष्ट करण्यात येईल. उर्वरित निधी १०,००० कोटी रुपयांचा निधी समभाग किंवा रोखे विक्रीच्या माध्यमातून एक किंवा अधिक टप्प्यात उभारला जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.