नवी दिल्ली : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या व्होडाफोन आयडियाला वाचविण्यासाठी कंपनीकडील १.९२ अब्ज डॉलर्सची सरकारची थकबाकी शेअर्समध्ये रूपांतरित करण्याच्या सरकारच्या प्रस्तावास बाजार नियामक सेबीने मंजुरी दिली आहे.
डबघाईला आलेल्या दूरसंचार कंपन्यांना पॅकेज देण्यास भारत सरकारने गेल्या वर्षी मंजुरी दिली होती. कंपन्यांकडील सकळ महसुलावरील व्याजासह एकूण थकबाकीचे समभागात रूपांतरित करणे, असे या पॅकेजचे स्वरूप होते. हा निर्णय प्रामुख्याने व्होडाफोन-आयडियासाठी घेण्यात आल्याचे मानले जात होते.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सेबीने सरकारच्या प्रस्तावास मंजुरी दिली असून, त्याची माहिती दूरसंचार मंत्रालयास देण्यात आली आहे. थकबाकीचे समभागात रूपांतर झाल्यानंतर व्होडाफोन-आयडियामध्ये सरकारचा वाटा ३० टक्क्यांपेक्षाही अधिक होईल. हा हिस्सा सार्वजनिक म्हणून जाहीर करण्याची सरकारची विनंतीही सेबीने मान्य केली आहे.