नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्यांकडून कर्मचारी कपातीच्या बातम्या समोर येत आहेत. दरम्यान, आता दूरसंचार कंपनी व्होडाफोनने देखील घोषणा केली आहे की, कंपनी 1 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी करत आहे. कंपनीतून 1 हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणे म्हणजे कंपनी आपल्या एकूण कर्मचार्यांपैकी 5 टक्के कर्मचारी कमी करण्याचा विचार करत आहे.
दरम्यान, व्होडाफोनने इटलीमध्ये काम करणाऱ्या 1 हजार कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. युनियनने काही काळापूर्वी ही माहिती रॉयटर्सशी शेअर केली होती. युनियनशी संबंधित दोन उच्च अधिकार्यांनी रॉयटर्सला सांगितले की, ब्रिटिश टेलिकॉम कंपनीला आपल्या इटली युनिटचा आकार कमी करायचा आहे. त्यासाठी कंपनीने मोठ्या प्रमाणावर खर्चात बचत करण्याचा निर्णय घेतला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीचे घसरलेले मार्जिन आणि महसुलातील घट यामुळे व्होडाफोनला दूरसंचार क्षेत्रात स्पर्धात्मक दबावाचा सामना करावा लागत आहे, असे व्होडाफोन इटालियाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे. युनियनसोबत झालेल्या बैठकीदरम्यान कर्मचारी कपातीबाबत माहिती देताना व्होडाफोनने सांगितले की, कंपनी आता ऑपरेशनल काम जलद आणि सुलभतेने पूर्ण करण्याच्या दिशेने काम करेल.
जानेवारीमध्ये कर्मचार्यांना दिली होती स्लिप
कंपनीच्या ताज्या वार्षिक रिपोर्टनुसार मार्चपर्यंत व्होडाफोन इटालियामध्ये एकूण 5 हजार 675 कर्मचारी काम करत होते. दरम्यान, 2023 च्या सुरुवातीस म्हणजेच सुरुवातीला अनेक मीडिया रिपोर्ट्सद्वारे असे समोर आले होते की, व्होडाफोनने लंडनमधील अनेक कर्मचार्यांना गुलाबी स्लिप देखील जारी केल्या होत्या.