- प्रसाद गो. जोशीभारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव, त्यामुळे बाजारात आलेली अनिश्चितता त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्याची सौदापूर्ती यामुळे बाजारावर विक्रीचे मोठे दडपण असतानाच तिसऱ्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेची झालेली घसरण मात्र उत्पादन क्षेत्राने नोंदविलेली वाढ आणि सरकारी धोरणाबद्दल वाटत असलेला विश्वास यामुळे परकीय वित्तसंस्थांनी केलेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांक वाढले.मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने सप्ताहाचा प्रारंभ मागील दोन सप्ताहांप्रमाणेच वाढीने केला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सप्ताहामध्ये ३६,३७१.११ ते ३५,७१४.१६ अंशांच्या दरम्यान हेलकावत अखेरीस ३६,०६३.८१ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये १९२.३३ अंशांची (०.५३ टक्के) वाढ झाली. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सुमारे ४०० अंशांनी वर गेलेला निर्देशांक नंतर तीन दिवस खालीच जात होता. त्यानंतर अखेरच्या दिवशी तो वाढला.राष्टÑीय शेअर बाजारातही सप्ताहात वाढ दिसून झाली. येथील निर्देशांक (निफ्टी) सप्ताहात ७२ अंशांनी (०.६६ टक्के ) वधारून १०,८६३.५० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे क्षेत्रीय निर्देशांकही हिरव्या रंगात बंद झाले आहेत. सप्ताहाच्या अखेरीस हे निर्देशांक अनुक्रमे १४,५०२.८२ आणि १३,९८१.७३ अंशांवर बंद झाले. मिडकॅपमध्ये ३३३.०८ अंश (सुमारे १.५ टक्के) तर स्मॉलकॅपमध्ये ४६४.०२ अंश (२ टक्के) अशी वाढ झाली.देशातील उत्पादन क्षेत्राचा परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) हा फेब्रुवारी महिन्यामध्ये ५४.३ असा झाला. त्याआधीच्या महिन्यामध्ये तो ५३.९ असा होता. सलग १९ महिन्यांपासून तो ५० अंशांच्या वर आहे. आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेची वाढ फारशी होऊ शकली नाही. ती ६.६ टक्के राहिली. गेल्या पाच तिमाहींमधील हा नीचांक आहे. यामुळे संपूर्ण वर्षभरातील अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाजही कमी करण्यात आला असला तरी अन्य देशांपेक्षा तो जास्तच आहे.>१५ महिन्यांतील सर्वाधिक गुंतवणूकभारतामधील सकारात्मक आर्थिक वातावरण आणि सरकारची खर्च करण्याची भूमिका यामुळे परकीय वित्तसंस्थांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये १७,२२० कोटी रुपये ओतले आहेत. नोव्हेंबर, २०१७ नंतर (१५ महिन्यांनंतर) प्रथमच परकीय वित्तसंस्थांनी भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. नोव्हेंबर, २०१७मध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतामध्ये १९,७२८ कोटी रुपये गुंतविले होते.फेब्रुवारी महिन्यात परकीय वित्तसंस्थांनी भारतीय शेअर बाजारामध्ये १,१७,८९९.७९ कोटी रुपये गुंतविले. याच काळात त्यांनी १,००,६८०.१७ कोटी रुपये बाजारातून काढूनही घेतले. याचाच अर्थ महिनाभरात या संस्थांनी एकूण १७,२१९.६२ कोटी रुपये गुंतविले आहेत. जानेवारी महिन्यामध्ये या संस्थांनी भारतीय बाजारामधून ५२६३.८५ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली होती.
अस्थिर वातावरणामध्येही बाजाराची वाढ कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 5:34 AM