आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने वाढणाऱ्या खनिज तेलाच्या किमती यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले निराशेचे वातावरण, तसेच कर्नाटकातील निवडणूक निकाल व तेथील अस्थिरता यामुळे सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये बाजार खाली आला. त्यातच परकीय वित्तसंस्थांनी कायम ठेवलेले विक्रीचे धोरण आणि नफा कमविण्यासाठी झालेली विक्री यामुळे बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३५ हजारांखाली आला.
मुंबई शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ तेजीने झाला. बाजाराचा निर्देशांक ३५५५५.८३ अंकांवर खुला झाला. त्यानंतर त्याने ३५९९३.५३ ते ३४८२१.६२ अंशांदरम्यान आंदोलने घेतली. सप्ताहाच्या अखेरीस तो ३४८४८.३० अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये ६८७.४९ अंशांनी घट झाली.
राष्टÑीय शेअर बाजारामध्येही सोमवारचा अपवाद वगळता मंदीचेच वातावरण दिसून आले. येथील निर्देशांक (निफ्टी) २१०.१० अंशांनी खाली येऊन बंद झाला. सप्ताहाच्या अखेरीस निफ्टी १०५९६.४० अंशांवर बंद झाला. बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांक मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही सलग तिसºया सप्ताहामध्ये घसरण झाली. सप्ताहाच्या अखेरीस मिडकॅप १५८९५.६८ तर स्मॉलकॅप १७३२६.७८ अंशांवर बंद झाला.
कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने तेथील अस्थिरतेचा बाजारावर विपरित परिणाम झाला. शुक्रवारी भाजपाच्या येडियुरप्पांना तातडीने बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत विक्रीचा वेग वाढविला. तसेच या सप्ताहात मार्च महिन्यातील औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर झाली. हा दर ४.४ टक्क्यांवर आल्याने त्याचाही बाजाराला फटका बसला. परकीय वित्तसंस्थांनी विक्री कायम ठेवली.
अमेरिका आणि इराण यांच्यातील शीतयुद्धामुळे आंतरराष्टÑीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढू लागले आहेत. त्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे. यामुळेही बाजारात सावध वाटचाल होत आहे.
महिनाभरात वाढले ८.३८ लाख गुंतवणूकदार
शेअर बाजारामधील धोके कमी करण्यासाठी गुंतवणूकदारांचा ओढा आता परस्पर निधी (म्युच्युअल फंड)कडे वाढलेला दिसत आहे. एकट्या एप्रिल महिन्यामध्ये वेगवेगळ्या ४२ म्युच्युअल फंडांमध्ये आठ लाख ३८ हजार नवीन गुंतवणूकदार दाखल झाले आहेत. आता गुंतवणूकदार खातेदारांची संख्या सात कोटी २२ लाख अशी विक्रमी झाली आहे.
असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अॅम्फी)ने जाहीर केल्यानुसार एप्रिल २०१८अखेर देशातील ४२ म्युच्युअल फंडांमधील खातेदारांची संख्या ७,२१,८५,९७० एवढी झाली आहे. मार्च अखेर ही संख्या ७,१३,४७,३०१ अशी होती. महिनाभरात ८ लाख ३८ हजार नवीन गुंतवणूकदार दाखल झाले आहेत.
इक्विटी आणि इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीममधील खाती सर्वाधिक वाढली असून, त्यापाठोपाठ बॅलन्स फंडांचा नंबर लागतो. इन्कम फंड्स आणि इटीएफमधील खात्यांची संख्या मात्र घटली आहे.
अस्थिरता, खनिज तेलाने बसला बाजाराला झटका
कर्नाटकातील निवडणूक निकाल व तेथील अस्थिरता यामुळे सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये बाजार खाली आला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 01:03 AM2018-05-21T01:03:08+5:302018-05-21T01:03:08+5:30