Lokmat Money > बिझनेस न्यूज > ४० पट जास्त प्रदूषण करतात फोक्सवॅगनच्या गाड्या

४० पट जास्त प्रदूषण करतात फोक्सवॅगनच्या गाड्या

फोक्सवॅगन या नामांकित जर्मन कंपनीने विकलेल्या ४.८२ लाख डिझेल कार अमेरिकेत नायट्रोजन आॅक्साईड हा विषारी घातक वायू हवेत सोडत होत्या.

By admin | Published: October 2, 2015 11:23 PM2015-10-02T23:23:28+5:302015-10-02T23:23:28+5:30

फोक्सवॅगन या नामांकित जर्मन कंपनीने विकलेल्या ४.८२ लाख डिझेल कार अमेरिकेत नायट्रोजन आॅक्साईड हा विषारी घातक वायू हवेत सोडत होत्या.

Volkswagen trains do 40 times more pollution | ४० पट जास्त प्रदूषण करतात फोक्सवॅगनच्या गाड्या

४० पट जास्त प्रदूषण करतात फोक्सवॅगनच्या गाड्या

निळू दामले
फोक्सवॅगन या नामांकित जर्मन कंपनीने विकलेल्या ४.८२ लाख डिझेल कार अमेरिकेत नायट्रोजन आॅक्साईड हा विषारी घातक वायू हवेत सोडत होत्या. अमेरिकन सरकारच्या प्रदूषण नियंत्रण विभागाला ते आढळून आले. सहनशक्ती मर्यादेच्या ४० पट जास्त घातक वायू या कार हवेत सोडत होत्या. या घातक वायूमुळे दरवर्षी ५८ हजार माणसे अमेरिकेत मरत होती.
जगभर १.१ कोटी कार विकणाऱ्या या कंपनीच्या कार देशोदेशी जाताना कार प्रदुषण करत नाही याची प्राणपत्रे घेऊन जातात. मग अमेरिकेतल्या कार प्रदूषण का आणि कसे करत होत्या? तिथंच गोची आहे. कंपनीने एक फसवणारे सॉफ्टवेअर कारमधे बसवले होते. कारची तपासणी होते तेव्हा कृत्रीम पट्टयावर गाडी पळवली जाते. कार कृत्रीम पट्टयावर चढवली की कार पट्टयावर आहे हे कारमधल्या कंप्यूटर नेटवर्कला कळायचे. या नेटवर्कला दोन सेटिंग होती, एक पट्टयावरचे आणि एक रस्त्यावरचे. गाडी पट्टयावर असली की आपोआप ते सेटिंग आॅन व्हायचे आणि एक सॉफ्टवेअर कार्यरत व्हायचे. कारच्या इंजिनातून बाहेर पडणाऱ्या धुरात या सॉफ्टवेअरमधल्या तरतुदीप्रमाणे वातावरणातली हवा मिसळली जायची. काही कारमधे युरियासदृष्य रसायन मिसळले जायचे. परिणाम असा की धुरातले नायट्रोजन आॅक्साईडचे प्रमाण कमी व्हायचे. परिणामी प्रदुषण मापक उपकरणात नायट्रोजनचे प्रमाण मर्यादेत दिसल्याने कारला प्रमाणपत्र मिळत असे. गाडी रस्त्यावर आली की नेटवर्कला ती रस्त्यावर आली हे कळून आपोआप दुसरा स्विच आॅन होऊन नेहमीसारखा धूर बाहेर पडणे सुरु होत असे.
युरोपात जिथं या कार तयार होत होत्या तिथेच त्याना प्रदूषण नसल्याचे प्रमाणपत्र दिले जात असे. प्रमाणपत्र देणाऱ्या कंपन्या खाजगी कंपन्या असतात. या कंपन्या आपसातल्या स्पर्धेमुळे सढळ हाताने प्रमाणपत्र देत असतात. बहुदा त्यांना वरील फसवेगिरी माहित असावी. दुसरे असे की युरोपीय देश कार्बन डाय आॅक्साईडबाबत दक्ष असतात, नायट्रोजन आॅक्साईडची ते फारशी काळजी करत नाहीत. त्यामुळे ढिसाळ, मानवी हितापेक्षा नफ्याला जास्त किमत देणाऱ्या, भ्रष्ट युरोपिय यंत्रणेने फोक्स वॅगनला प्रदुषण रहिततेचे प्रमाणपत्र दिले.
दोन वर्षांपूर्वी एका संस्थेने फोक्सवॅगनची लबाडी उघड करून जर्मन सरकार आणि खुद्द कंपनीला नायट्रोजन डाय आॅक्साईडच्या घातक प्रमाणाबद्दल कळवले होते. दोघेही गप्प राहिले. अमेरिकेतली तपासणी यंत्रणा अधिक सजग असल्याने घोटाळा उघडकीला आला. अमेरिकन सरकार आता कंपनीवर खटला भरतेय, दर कारमागे ३७ हजार डॉलर दंड ठोठावला जाणार आहे. नंतरही कदाचित क्लास अ‍ॅक्शन खटला भरून अधिक भरपाई अमेरिकन सरकार वसूल करेल. घोटाळा साऱ्या दुनियेला माहित झाल्याने जिथे जिथे या कार विकल्या गेल्या तिथले देशही दंड ठोकतील. पंधरा वीस अब्ज युरोचा फटका फोक्स वॅगनला बसणार आहे.
२०१४ मधे जनरल मोटर्सच्या कारमधे दोष आढळले होते. परिणामी १२४ माणसे मेली होती. कंपनीवर खटला झाला. कंपनीला ९० कोटी डॉलरचा दंड झाला. दंड भरून कंपनीने प्रकरण मिटवले. परंतु अमेरिकेत या प्रश्नी चर्चा झाली. दंड भरून प्रकरण मिटवण्याने भागत नाही, हा उद्योग करणाऱ्या माणसांनाही शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी झाली. अमेरिकन सरकारने त्यातून धडा घेऊन कायद्यात बदल करायचे ठरवले आहे. दोषी माणसांना तुरुंगात पाठवायची तरतूद आता अमेरिका करत आहे आणि ही तरतूद फोक्सवॅगन घोटाळ्यापासून अंमलात आणली जाण्याची शक्यता आहे.
मुळातच नायट्रोजन आॅक्साईडचे प्रमाण धुरात वाढणार नाही यासाठी आवश्यक सुधारणा करता आल्या नसत्या काय? फोक्सवॅगनने २०१४ मधे संशोधनावर १३.१ अब्ज युरो खर्च केले होते. मग ते सारे संशोधन कशा प्रकारचे होते? ते संशोधन कारचा वेग वाढवणे, दर लिटरमागे कार जास्तीत जास्त पळवणे यासाठी होते. धुरातल्या नायट्रोजन आॅक्साईडमधला नायट्रोजन वेगळा करून तो पुन्हा वापरण्याचे तंत्रज्ञान कार उद्योगाला माहित आहे. डिझेल कारमधे धुरातला नायट्रोजन पुन्हा वापरणे सहज शक्य आहे. परंतु ती यंत्रणा बसवायची म्हणजे खर्च आला. म्हणजे कार आणखी महाग झाली. कार महाग केली तर इतर कारच्या तुलनेत स्पर्धेत मागे पडणार.
दुसरे असे की पुर्नवापराची यंत्रणा बसवली की त्या यंत्रणेचे ओझे ऊर्जा वापरावर पडते आणि कारचा वेग कमी होतो, दर लीटरमधे मिळणारे मैल कमी होतात. म्हणजे कार वापरणाऱ्याच्या खिशावर बोजा पडतो. या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी स्वस्त उपाय म्हणून फसवेगिरी करणारे सॉफ्टवेअर कंपनीने वापरले. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवणे मग त्या खटाटोपात माणसांचे काहीही होवो.
आज आपल्या दैनंदिन जगण्यात अनंत यंत्रे प्रवेशली आहेत. फ्रीज, मायक्रोवेव, वॉशिंग मशीन, गॅस, पंखा, मोबाईल फोन, टीव्ही आहे. शिवाय आपण टॅक्सी, रिक्षा, विमान या यंत्रांवर बसून प्रवास करतो. या साऱ्या यंत्रामधे कंप्युटर नेटवर्क्स बसवलेली आहेत. वरील यंत्रामधूनही घातक वायू कशावरून बाहेर पडत नसतील? तिथून माणसाच्या जगण्याला घातक अशा काही तरंग लहरी कशावरून बाहेर पडत नसतील? शरीरावर परिणाम करणाऱ्या लहरी? तिथेही घातक वायू लपवणारे सॉफ्टवेअर कशावरून बसवलेले नसेल? घातकता तपासणीच न करता किवा घातकता लपवणारी सॉफ्टवेअर त्यात कशावरून बसवली नसतील? आज आपल्या जगण्याचा ताबाच कप्यूटर नेटवर्कनी घेतला आहे. तेव्हा ही नेटवर्क, कंप्यूटर कसे काम करतात, तिथे काय धोका आहे वगैरे तपासण्याच्या यंत्रणा तयार कराव्या लागतील.
फोक्सवॅगनमधून बाहेर पडणारा धूर डोळ्याना दिसत नव्हता म्हणून सारे खपून गेले. भारतात, प्रत्येक शहरात कार, ट्रक, आॅटो, बाईक्स लाखो नव्हे करोडोच्या संख्येनं धावत असतात. त्यातून बाहेर पडणारा धूर डोळ्यांना दिसत असतो, कानांना आणि नाकांना त्रास देत असतो. भारतात किती लाख माणसे या प्रदुषणानं मरतात त्याची मोजदाद करणेही कठीण आहे. मरता येत नाहीत म्हणून प्रचंड त्रासात जगणारी माणसे किती आहेत याचीही मोजदाद करता येत नाही.
भारत हा देश तर अधिक कार्यक्षमतेवर भर देणारा आहे. तो फसवेगिरी करणारे सॉफ्टवेअर तयार करण्यावरही खर्च करत नाही. बेधडक प्रदुषण करणारी यंत्रे तयार होतात, बेधडक ती विकली जातात. अग्नीशमन दल असो, आरटीओ असो, प्रदुषण नियंत्रण यंत्रणा असोत. बेधडक या यंत्रणा पैसे खाऊन प्रदुषणाला परवानगी देत असतात. आग लागणे अटळ आहे अशा गोष्टी असलेल्या इमारतींना अग्नीशमन दल पैसे खाऊन परवानगी देते आणि त्या आगी विझवण्यात अग्निशमन दलाचेच जवान मारले जातात.
अमेरिका फोक्सवॅगनच्या विंटरकॉर्नला त्याने प्रदुषण लपवणारे सॉफ्टवेअर कारमधे बसवले या बद्दल तुरुं गात पाठवणार आहे. भारतात कोणाकोणाला तुरुं गात पाठवणार? पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, कंपन्यांचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक, आयएस अधिकारी आणि आयपीएस अधिकारी अशा किती लोकांना तुरुंगात धाडणार? तुरूंग पुरतील? अंगावर काटा उभा रहातो.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

Web Title: Volkswagen trains do 40 times more pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.