नवी दिल्ली : गृहपयोगी उपकरणांच्या क्षेत्रात व्होल्टास कंपनीने बेको या ब्रॅण्डच्या सहकार्याने प्रवेश केला आहे. व्होल्टास ही एसी तयार करणारी भारतातील अग्रणी कंपनी आहे. तर बेको हा वॉशिंग मशीन, डिशवॉशर, मायक्रोव्हेव तयार करणारा युरोपातील अग्रणी ब्रॅण्ड आहे. या दोघांनी मिळून व्होल्टबेक होम अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड ही संयुक्त कंपनी स्थापन केली आहे. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात या कंपनीचा शुभारंभ झाला.
याबाबत व्होल्टास लिमिटेडचे हे अध्यक्ष नोएल टाटा म्हणाले की, या भागिदारीमुळे जागतिक स्तरावरील उत्तम दर्जाची उत्पादने भारतात येऊ शकतील. गृहपयोगी उपकरणांमधील युरोपीयन तंत्रज्ञानही भारतात येऊ शकणार आहे.
व्होल्टास लिमिटेडचे सीईओ प्रदीप बक्षी यांनी सांगितले की, कंपनीने भारतीय प्रवेश करताना ‘मेक इन इंडिया’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत २०२० पर्यंत सर्व उपकरणांचे उत्पादन गुजरातमधील साणंद येथील प्रकल्पात होईल. याद्वारे गृहपयोगी वस्तू बाजारात अग्रणी होण्याचा कंपनीचा मानस आहे. ‘बेको’ हा आर्सेलिक कंपनीचा ब्रॅण्ड आहे. कंपनीचे सीईओ हाकन बलगुर्लू यांनी सांगितले की, भारतीयांची क्रयशक्ती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गृहपयोगी उपकरणांचा बाजारही येथे सातत्याने वाढता आहे. हे ध्यानात घेऊनच ही भागिदारी करण्यात आली आहे. व्होल्टबेक होम अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी येत्या काळात देशात १०० शो-रुम (स्टॉककीपिंग युनिट्स) उभे करणार आहे. त्यापैकी ४४ शो-रुम फ्रिज, ४० वॉशिंग मशीन्स, १२ मायक्रोव्हेव व सात शो-रुम हे डिशवॉशर्सचे असतील.
गृहोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात व्होल्टास-बेकोचा प्रवेश
१०० शो-रुम उभे करणार; इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 02:33 AM2018-09-17T02:33:30+5:302018-09-17T02:33:51+5:30