Join us

सोन्याच्या ‘अक्षय्य’ खरेदीत प्रथमच खंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 3:43 AM

यात अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर कमॉडिटी बाजारातील एकूण व्यवहारात ५५ टक्के खरेदीचे व्यवहार झाले.

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउनच्या काळात सुवर्ण पेढ्या बंद असल्याने इतिहासात प्रथमच यंदा अक्षय्यतृतीयेच्या दिवशी प्रत्यक्ष सोने खरेदीत प्रथमच खंड पडला आहे. यामुळे सुवर्ण व्यावसायिकांच्या व्यवसायात सुमारे सहा कोटी रु पयांची झळ बसली आहे. असे असले तरी कमॉडिटी बाजारात सोने खरेदीला चांगलीच झळाळी येऊन मोठ्या प्रमाणात सोन्याचे सौदे झाले. यात अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर कमॉडिटी बाजारातील एकूण व्यवहारात ५५ टक्के खरेदीचे व्यवहार झाले.जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनामुळे राज्यात २३ मार्चपासून सुवर्णपेढ्यांसह सर्व दुकाने बंद आहेत. त्यानंतर लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढविण्यात आल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली. सुवर्ण बाजारावर गेल्या दोन महिन्यांपासूनच परिणाम जाणवत आहे. परिणामी यंदाचे सुवर्ण खरेदीचे गुढीपाडवा व अक्षय्यतृतीयाचे मुहूर्त बंदमध्येच गेले. सोने खरेदीसाठी विजयादशमी, धनत्रयोदशी, गुढीपाडवा व अक्षय्यतृतीया या सणांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. यातही अक्षय्यतृतीयेला खरेदी केलेले सोने अक्षय असते अशी सर्वांचीच भावना आहे. त्यामुळे या दिवशी सोन्यात मोठी उलाढाल होते. यंदा मात्र प्रथमच जळगावातील सुवर्ण बाजाराच्या दीडशे वर्षांच्या परंपरेत अक्षय सोने खरेदीत खंड पडला आहे.यापूर्वी विविध मागण्यांसाठी कधी चार ते पाच दिवस सुवर्ण बाजार बंद राहिला तर १९८४ मध्ये उसळलेल्या दंगलीमुळे चार दिवस सुवर्ण बाजार बंद होता, मात्र त्यामध्ये ग्राहकांची मुहूर्तावरील सुवर्ण खरेदी कधी टळली नाही, मात्र यावेळी कोरोनामुळे थेट खरेदीचे दोन मुहूर्त हातचे गेले. या दोन मुहूूर्तावरील खरेदी टळण्यासह लग्नसराईचीदेखील खरेदी थांबली. मार्च महिन्यात अनेक विवाह मुहूर्त होते, मात्र कोरोनाच्या सावटामुळे अनेकांनी ते लांबणीवर टाकले आहे. परिणामी सुवर्ण खरेदीही लांबणीवर पडली आहे. त्यामुळे व्यावसायिकांचा यंदाचा पूर्ण हंगामाच हातचा गेला आहे.>कमॉडिटी बाजारात झळाळीसुवर्णपेढ्या बंद असल्या तरी कमॉडिटी बाजारात सोन्याची मोठी उलाढाल होत आहे. त्यात अक्षय्यतृतीयेला अधिक झळाली आली. या मुहूर्तावर खरेदीचे प्रमाण ५५ टक्के राहिले तर विक्र ी केवळ ३१ टक्केच होती. तसेच १४ टक्के थांबलेल्या व्यवहारांचे (होल्ड) प्रमाण होते.जळगावातील सुवर्ण बाजाराच्या इतिहासात यंदा प्रथमच अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी झाली नाही. असे असले तरी सध्या सर्वांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याने या बंदचा सर्व जण स्वीकार करीत आहेत.- स्वरूप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन.