Join us

Waaree Energies IPO : एकेकाळी ₹५००० उसने घेऊन सुरू केलेली कंपनी, आज कोट्यवधींचं साम्राज्य; IPO येताच ५०० कोटींचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 2:32 PM

Waaree Energies IPO: वारीच्या आयपीओनं सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला असला तरी हितेश चिमणलाल दोशी यांनी या आयपीओतून मोठा नफा कमावला आहे. कोण आहेत हितेश चिमणलाल दोशी? जाणून घेऊया सविस्तर...

Waaree Energies IPO: सोलर पॅनेल निर्माती वारी एनर्जीजचा आयपीओ सोमवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीचे शेअर्स १,५०३ रुपयांच्या आयपीओ प्राइस बँडपेक्षा सुमारे ७० टक्क्यांनी वधारुन २,५५० रुपयांवर लिस्ट झाले. आज लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशी हा शेअर ५ टक्क्यांनी वधारला आहे. बीएसईवर हा शेअर ५ टक्क्यांनी वधारून २,४५४ रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. या आयपीओनं सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला असला तरी हितेश चिमणलाल दोशी यांनी या आयपीओतून मोठा नफा कमावला आहे. कोण आहेत हितेश चिमणलाल दोशी? जाणून घेऊया सविस्तर...

५००० रुपये उसने घेतले

हितेश चिमणलाल दोशी वारी रिन्यूएबल्स टेक्नॉलॉजीजचे चेअरमन आहेत. १९८५ मध्ये मुंबईत शिक्षण घेत असताना एका नातेवाईकाकडून पाच हजार रुपये उसने घेऊन दोशी यांनी या व्यवसायात पाऊल ठेवलं. पाच हजार रुपये उधार घेऊन प्रेशर आणि टेम्परेचर गेज विकण्याचा व्यवसाय सुरू केला. मात्र, अभ्यास आणि व्यवसाय दोन्ही सांभाळणं दोशी यांच्यासाठी अवघड होत होतं. असं असूनही ते महिन्याला एक हजार रुपये नफा मिळवून कॉलेजची फी आणि राहण्याचा खर्च भागवत होते. 

सप्टेंबर १९८९ मध्ये त्यांनी वारी इन्स्ट्रूमेंट्स या नावानं आपल्या कंपनीची नोंदणी केली आणि पहिल्या वर्षी त्यांच्या कंपनीची उलाढाल १२ हजार रुपये झाली. आता जवळपास ४० वर्षांनंतर दोशी यांची कंपनी ७१,२४४ कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह रिन्युएबल एनर्जी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.

असा वाढला व्यवसाय

२०१४ मध्ये हितेश चिमणलाल दोशी यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात झाला. त्यांचे वडील किराणा दुकान चालवायचे. गावात वीज आणि फोन सारख्या सुविधाही मर्यादित होत्या. त्यांचं केवळ सातवीपर्यंतचे शिक्षण त्या गावात झालं, त्यामुळे पुढील शिक्षणासाठी त्यांना सायकलनं दुसऱ्या गावी जावं लागत होतं. बारावीनंतर ते मुंबईत स्थायिक झाले आणि त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या श्री चिनाई कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी घेतली. याच काळात त्यांना व्यवसायाची आवड निर्माण झाली आणि मग कुटुंबाचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी त्यांनी १९८५ साली एका नातेवाईकाकडून ५ हजार रुपये उधार घेऊन टेंपरेचर गेजचा व्यवसाय सुरू केला, तेव्हा त्यांना वॉटर पंप, हीटर, कुकर, कंदील यांसारख्या विद्युत उपकरणांच्या व्यवसायांची शक्यता दिसली.

त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी आपली छोटी कंपनी स्थापन केली आणि आपल्या गावातील वारी मंदिराच्या नावावरून या कंपनीचं नाव वारी एनर्जी ठेवलं. त्यासाठी बँकेकडून दीड लाख रुपयांचं कर्जही घेतलं. हळूहळू त्यांनी आपला व्यवसाय विस्तारला आणि २००७ मध्ये सौर उपकरणांचे उत्पादन सुरू केलं. अशा प्रकारे वारी एनर्जीचा विस्तार झाला. त्यांची सर्वात मोठी ऑर्डर अमेरिका आणि युरोपमधील ग्राहकांकडून आली. एका रिपोर्टनुसार, ऑक्टोबर २०२४ पर्यंत भारतातील एकूण स्थापित ऊर्जा क्षमतेपैकी रिन्युएबल एनर्जी हिस्सा सुमारे निम्मा आहे आणि ४५७ गिगावॅट ऊर्जेपैकी सौर ऊर्जेचा वाटा २०% आहे.

आता एवढी संपत्ती

सोमवारी वारी एनर्जीच्या लिस्टिंगमुळे दोशी आणि त्यांचं कुटुंब जगातील सर्वात श्रीमंतांच्या पंक्तीत सामील झाले. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, वारी एनर्जीच्या शेअर्सच्या लिस्टिंगनंतर दोशी कुटुंबाची नेटवर्थ सुमारे ५ अब्ज डॉलर (५०० कोटी रुपये) झाली आहे. वारी एनर्जी ही भारतातील सर्वात मोठी सौर मॉड्यूल उत्पादक कंपनी असून त्याची क्षमता १२,००० मेगावॅट आहे. 

(टीप - यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगप्रेरणादायक गोष्टीव्यवसाय