Waaree Energies Share Price : भारतातील सर्वात मोठी सोलर पॅनल उत्पादक वारी एनर्जीजच्या शेअर्समध्ये या आठवड्यात जबरदस्त वाढ झाली आहे. बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये ७.६ टक्क्यांची उसळी आली, ज्यामुळे बीएसईवर कंपनीच्या शेअर्सनं ३,७४०.७५ रुपयांचा नवा उच्चांक गाठला. त्यामुळे वारी एनर्जीजचे बाजार भांडवल एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलं आहे.
कंपनीने २८ ऑक्टोबर रोजी १,५०३ रुपयांच्या इश्यू प्राइसवर आयपीओ लाँच केला होता आणि आता त्याच्या शेअर्समध्ये सुमारे ४९% वाढ झाली आहे. हा सौर ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या गुंतवणुकीचा परिणाम असल्याचं म्हटलं जातंय.
आयपीओला मोठा प्रतिसाद
वारी एनर्जीजचा आयपीओ ४,३२१ कोटी रुपयांचा होता, त्याला विक्रमी प्रतिसाद मिळाला. त्यासाठी २.४१ लाख कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती आणि ९७.३४ लाख अर्ज प्राप्त झाले होते. हे भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील कोणत्याही आयपीओसाठी सर्वाधिक होते. हे यश कंपनीसाठी खूप महत्वाचं असल्याचं म्हटलं जातंय.
कामकाजादरम्यान वारी एनर्जीज लिमिटेडच्या शेअरची किंमत ३,६२५.०५ रुपयांपर्यंत पोहोचली होती. त्यात कामकाजादरम्यान १५२.३५ रुपये (४.३९%) वाढ झाली होती. शेअरची आजची उच्चांकी पातळी ३,७४३ रुपये आणि नीचांकी पातळी ३,४२५ रुपये होती. कंपनीचं मार्केट कॅप १.०४ लाख कोटी रुपये असून पी/ई रेशो ७५.९७ आहे. गेल्या ५२ आठवड्यांमध्ये या शेअरनं ३,७४३ रुपयांची उच्चांकी आणि २,३०० रुपयांची नीचांकी पातळी पाहिली आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)