Join us

Waaree Energies Share Price : वारी एनर्जीच्या आयपीओनं केलं मालामाल, ७०% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 12:18 PM

Waaree Energies Share Price : वारी एनर्जीच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं. तर दुसरीकडे दीपक बिल्डर्सच्या आयपीओनं मात्र गुंतवणूकदारांची निराशा केली.

Waaree Energies Share Price :वारी एनर्जीज आणि दीपक बिल्डर्स इंजिनीअर्सचे शेअर्स आज शेअर बाजारात लिस्ट झाले. अपेक्षेप्रमाणे वारी एनर्जीजच्या आयपीओची लिस्टिंग (Waaree Energies Share Price ) झाली नाही. बीएसईवर त्याची लिस्टिंग ६९.६६ टक्के प्रीमियमसह २५५० रुपयांवर झाली. आयपीओमध्ये याची इश्यू प्राइस १५०३ रुपये होती. त्यामुळे लिस्टिंगच्या (waaree energies listing price) पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना प्रति शेअर १०४७ रुपये नफा झाला. तर दुसरीकडे एनएसईवर वारीच्या शेअरचं लिस्टिंग २५०० रुपयांवर झालं.

हा आयपीओ २१ ऑक्टोबररोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि २३ ऑक्टोबरला बंद झाला. आयपीओ खुला झाल्यापासूनच याला तुफान प्रतिसाद मिळाला होता. तीन दिवसांत या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा आयपीओ ७६.३४ पट सब्सक्राइब झाला होता. या आयपीओनं बजाज हाऊसिंग फायनान्स, एलआयसी यांसारखे अनेक मोठे आयपीओही मागे टाकले.

ग्रे मार्केटमध्ये उत्तम कागगिरी

ग्रे मार्केटमध्येही या आयपीओने चांगली कामगिरी केली. ग्रे मार्केटमध्ये एकेकाळी त्याचा जीएमपी त्याच्या इश्यू प्राइसपेक्षा दुप्पट होता. मात्र, अलॉटमेंटनंतर त्यात घसरण दिसून आली. तो ८० टक्क्यांच्या जवळपास आला. मात्र, त्यानंतर काही प्रमाणात सुधारणा झाली. लिस्टिंगच्या एक दिवस आधी म्हणजेच काल त्याचा जीएमपी ८४.८३ टक्क्यांच्या प्रीमियमसह १२७५ रुपयांवर होता. अशा तऱ्हेने तो २७७८ रुपयांवर लिस्ट होणे अपेक्षित होते. मात्र, तसं झालं नाही. 

निधीचं काय करणार कंपनी?

१९९० मध्ये स्थापन झालेली वारी एनर्जी आयपीओमधून मिळणाऱ्या निधीचा वापर ओडिशामध्ये इंगिट वेफर्स, सोलर सेल आणि सोलर पीव्ही मॉड्यूल तयार करण्यासाठी ६ गिगावॅट उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी करणार आहे. याव्यतिरिक्त, एक भाग सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी ठेवला जाईल. सध्या कंपनीची १२ गिगावॅट सौर मॉड्यूल तयार करण्याची क्षमता आहे. तसंच कंपनीनं २० टक्के बाजारपेठही व्यापली आहे. कंपनीचे सध्या गुजरातमध्ये चार उत्पादन प्रकल्प आहेत.

दीपक बिल्डर्सचं डिस्काऊंट लिस्टिंग

आज दीपक बिल्डर्स अँड इंजिनिअर्सचा आयपीओही लिस्ट झाला. या लिस्टिंगमधील गुंतवणूकदारांची निराशा झाली. हा आयपीओ इश्यू प्राइसपेक्षा कमी किमतीत लिस्ट करण्यात झाला. बीएसईवर हा आयपीओ २.२२ टक्क्यांच्या डिस्काऊंटेड प्राईजसह १९८.५० रुपयांवर लिस्ट झाला. याची इश्यू प्राइस २०३ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. अशा तऱ्हेने या आयपीओच्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर ४.५० रुपयांचं नुकसान झाले. एनएसईवर याचं लिस्टिंग २०० रुपयांवर झालं.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार