गेल्या २ मे पासून जमिनीवरच स्थिरावलेल्या गो-फर्स्ट कंपनीच्या मालमत्तेचा लवकरच लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लिलावाद्वारे किमान तीन हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
मे महिन्यापासून पूर्णपणे थंडावलेल्या गो-फर्स्ट कंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज केला होता. दिवाळखोरीच्या नियमानुसार लीलावाद्वारे कंपनी विकण्याची देखील तयारी सुरू करण्यात आली होती. कंपनीच्या खरेदीसाठी स्वारस्य अभिव्यक्तीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.
किती कोटींचं कर्ज?
परंतु, कंपनीच्या डोक्यावर एकूण ६५२१ कोटी रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये प्रामुख्याने बँक ऑफ बडोदा, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, डोईश बँक, आयडीबीआय बँक यांनी कर्जरूपाने दिलेले पैसे अडकले आहेत. याशिवाय काही भाडेकरुंचे २ हजार कोटी, वेंडर्सचे १ हजार कोटी, ट्रॅव्हल एजंट्सचे ६०० कोटी आणि रिफंडच्या ग्राहकांचे ५०० कोटी रुपये देखील देणे आहे. याशिवाय गो फर्स्टनं कोरोना महासाथीदरम्यान केंद्राच्या इमर्जन्सी क्रेडिट स्कीम अंतर्गत १२९२ कोटी रुपये घेतले होते. कंपनीवर एकूण मिळून ११ हजार कोटी रुपयांची देणी आहेत.
यापूर्वी सीईओंचा राजीनामा
गो फर्स्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कौशिक खोना यांनी यापूर्वी राजीनामा दिला होता. खोना यांनी गुरुवारी एअरलाइन कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवला. ३० नोव्हेंबर हा त्यांचा कंपनीत शेवटचा दिवस आहे, असं त्यांनी ईमेलमध्ये नमूद केलं होतं. खोना ऑगस्ट २०२० मध्ये सीईओ म्हणून गो फर्स्टमध्ये आले होते. यापूर्वी २००८ ते २०११ या कालावधीत ते गो फर्स्टसोबत होते.