Join us

Ola Electric IPO: प्रतीक्षा संपली? 'या' तारखेपासून Ola Electric IPO मध्ये करू शकाल गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 3:52 PM

Ola Electric IPO : गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओच्या प्रतीक्षेत आहेत. आता या आयपीओची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर आहे.

Ola Electric IPO : ओला इलेक्ट्रिक आयपीओची प्रतीक्षा संपणार आहे. रिपोर्टनुसार, भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ २ ऑगस्ट रोजी उघडणार आहे. सीएनबीसी टीव्ही १८ च्या रिपोर्टनुसार, ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ २ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट दरम्यान किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. तर हा आयपीओ अँकर गुंतवणूकदारांसाठी (मोठ्या गुंतवणूकदारांसाठी) १ ऑगस्टरोजी खुला होणार आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर ओला इलेक्ट्रिककडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही.

९ ऑगस्टला होऊ शकतं लिस्टिंग

रिपोर्टनुसार, ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओची मुंबई स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग ९ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. ओला इलेक्ट्रिक या आयपीओद्वारे ५५०० कोटी रुपयांचे शेअर्स फ्रेश इश्यू आणि ९५.२ मिलियन शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी करेल.

ड्राफ्ट पेपर्सनुसार, विद्यमान भागधारक ९५.१९ मिलियन शेअर्सची विक्री करणार आहेत. कंपनीचे संस्थापक भावेश अग्रवाल ४७.३० मिलियन शेअर्सची विक्री करतील. याशिवाय कंपनीचे सुरुवातीचे गुंतवणूकदार अल्फावेव्ह, अल्पाइन, डीआयजी इन्व्हेस्टमेंट, मॅट्रिक्स आणि इतर ऑफर फॉर सेल अंतर्गत ४७.८९ मिलियन शेअर्स विकणार आहेत.

२९ जुलै रोजी रोड शो

ओला इलेक्ट्रिकच्या वाहनांचा रोड शो २९ जुलैला होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर २०२३ च्या अखेरच्या राऊंडमध्ये कंपनीचं मूल्य ५.४ अब्ज डॉलर्स होतं. आयपीओदरम्यान कंपनीचे मूल्य ४.२४ अब्ज डॉलर्स होतं.

ओला इलेक्ट्रिकनं २२ डिसेंबर २०२३ रोजी सेबीकडे कागदपत्रं दाखल केली. कोटक महिंद्रा कॅपिटल, गोल्डमन सॅक्स, अॅक्सिस कॅपिटल, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, बोफा सिक्युरिटीज, सिटी, बीओबी कॅप्स आणि एसबीआय कॅप्स इन्व्हेस्टमेंट बँक म्हणून कार्यरत आहेत. सेबीनं गेल्या महिन्यात ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओला मंजुरी दिली होती.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :ओलाइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार