- प्रसाद गो. जोशी
अमेरिकेमध्ये तूर्तास व्याजदरामध्ये वाढ न होण्याचा मिळालेला संकेत लक्षात घेतला तर परकीय वित्तसंस्था भारतामधून पैसे काढून घेण्याबाबत काय भूमिका घेतात यावर बाजाराचे प्रामुख्याने लक्ष राहणार आहे. याशिवाय विविध कंपन्यांचे तिमाही निकाल, खनिज तेलाचे दर आणि सप्ताहाच्या अखेरीस जाहीर होणारी औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी यावरही बाजाराची वाटचाल अवलंबून असेल. दोन सप्ताहांच्या घसरणीनंतर गतसप्ताहात बाजारामध्ये वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ५८०.९८ अंशांनी वर जाऊन ६४,३६३.७८ अंशांवर थांबला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १८३.६० अंशांनी वाढून १९,२३०.६० अंशांवर पोहोचला आहे. मिडकॅप व स्मॉलकॅप हे क्षेत्रीय निर्देशांक अनुक्रमे ६२३.३५ व ३५१.९३ अंशांनी वाढले.या सप्ताहात अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार असून त्यावर गुंतवणूकदारांचे धोरण ठरू शकते. याशिवाय देशांतर्गत वित्तसंस्था काय पावले टाकतात याकडेही बाजाराचे लक्ष आहे. सप्ताहाच्या अखेरीस जाहीर होणारी औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी या सप्ताहात काही प्रभाव दाखविण्याची शक्यता नाही. कारण ती जाहीर होईपर्यंत बहुधा बाजारातील व्यवहार संपलेले असतील. या आकडेवारीचा प्रभाव रविवारी होणाऱ्या मुहूर्ताच्या सौद्यांवर होऊ शकेल.
तीन दिवसांमध्ये काढून घेतले ३,४०० कोटी- भारतासह आशियामधील बाजारांमधून पैसे काढून घेण्याची गती परकीय अर्थसंस्थांनी वाढविलेली दिसते. चालू महिन्यात पहिल्या तीन दिवसांमध्ये संस्थांनी शेअर बाजारामधून ३४०० कोटी काढून घेतले. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांमध्ये या संस्थांनी अनुक्रमे १४,७६७ कोटी व २४,५४८ कोटी रुपये काढून घेतले आहेत.- युद्धामुळे अस्थिर बनलेली स्थिती, अमेरिकेतील बॉण्ड्सच्या व्याजदरांत वाढ व आगामी ख्रिसमससाठी युरोपातून काढली जाणारी गुंतवणूक यामुळे संस्था पैसा काढत आहेत. भारताला खनिज तेलाच्या वाढीव दरांचा फटका बसू शकतो. त्यामुळेही या संस्थांनी सावधगिरीचे धोरण अवलंबलेले असावे. दरवर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये परकीय वित्तसंस्था भारतीय भांडवल बाजारातून पैसे काढून घेत असतात.