Electric Vehicle : इलेक्ट्रीक वाहनं लवकरच महाग होऊ शकतात. इलेक्ट्रीक वाहनांचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर किंमत वाढवण्यासाठी दबाव आहे. त्यांच्यासाठी इनपुट कॉस्ट जास्त आहे आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचा परिणाम आता त्यांच्यावर दिसून येत आहे. सध्या इलेक्ट्रीक कार उत्पादक कंपन्यांकडून किंमती वाढवण्यात आलेल्या नाहीत. परंतु रुपयाची घसरण सुरू राहिल्यास काही काळानंतर वाहनांच्या किमती वाढू शकतात. इलेक्ट्रीक वाहनांमध्ये वापरण्यात येणारे 40-45 टक्के भाग आयात केले जातात, ज्याची रक्कम डॉलर्समध्ये दिली जाते. सध्या ही वाहनं अधिक लोकप्रिय होत असली तरी संख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे.
७ ते १० टक्क्यांची होऊ शकते वाढ
इलेक्ट्रीक वाहन कंपन्या जगभरातील पुरवठादारांकडून मायक्रोचिप आणि सेमीकंडक्टर भाग आयात करतात. भागांच्या आयातीच्या बाबतीत, देशातील इलेक्ट्रीक वाहन कंपन्यांना किमतीच्या आघाडीवर समान फायदा मिळत नाही, जो वाहनांच्या ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्सना (OEMs) मिळत आहे.. “इलेक्ट्रीक वाहनांचे 40-45 टक्के भाग आयात केले जातात. त्यामुळे रुपयाच्या घसरणीमुळे 7 ते 10 टक्क्यांनी भाववाढ करण्याचा दबाव असेल,” अशी प्रतिक्रिया सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रीक व्हेइकल्सचे (SMEV) महासंचालक सोहिंदर गिल यांनी दिली.
सेमीकंडक्टरची समस्या
दीर्घ काळापासून असलेली सेमीकंडक्टरच्या समस्येनं तेजीनं वाढणाऱ्या टू व्हिलर इलेक्ट्रीक मार्केटच्या गतीला ब्रेक लावला आहे. मागणी वाढली असली तरी पुरवठा नसल्यानं इलेक्ट्रीक टू व्हिलर ब्राँड्सची विक्री मंदावली असल्याची माहिती ओकिनावा ऑटोटेकचे संस्थापक जितेंद्र शर्मा यांनी दिली.
उत्पादन वाढवणं आव्हान
देशात इलेक्ट्रीक गाड्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत नाही. मार्जिन कमी असल्यानं स्थिती बिकट आहे. मागणी चांगली आहे. परंतु आम्ही कोणत्या प्रमाणात त्याचा फायदा करू शकू अशी प्रतिक्रिया अल्टीग्रीन प्रोपल्सन लॅब्सचे फाऊंडर अमिताभ सरन यांनी दिली.