मुंबई : ‘फ्लिपकार्ट’चे ७७ टक्के भाग भांडवल १६ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केल्यावर ती कंपनी चालविण्यास वॉलमार्ट अनिवासी भारतीयांची भरती करणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.एकीकडे अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकार एच-१ बी व्हिसाचे नियम कडक करीत असताना बेकारीची तलवार डोक्यावर लटकत असलेल्या अनिवासी भारतीयांसाठी ही खूशखबर आहे. फ्लिपकार्टसोबतचा सौदा वॉलमार्ट पुढील वर्षीपर्यंत पूर्ण करेल पण यापूर्वी मुख्य वित्त अधिकारी, विधी सल्लागार व मुख्य प्रशासकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांची भरती वॉलमार्ट करेल, असे सूत्रांनी सांगितले.वॉलमार्टने २००७ साली भारतात प्रवेश केला पण सिंगल ब्रँडमध्ये १०० टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी नसल्याने वॉलमार्टने बेस्ट प्राईस या नावाने ठोक विक्रीकेंद्रे सुरू केली. पण भारतीय किरकोळ बाजारावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचे स्वप्न वॉलमार्ट बघत असल्याने वॉलमार्टने फ्लिपकार्टचे अधिग्रहण केले आहे. सचिन व बिन्नी बंसल यांनी स्थापन केलेली फ्लिपकार्ट भारतातील सर्वात मोठी आॅनलाईन रिटेल कंपनी आहे. त्यामुळे आता फ्लिपकार्टद्वारे वॉलमार्ट भारताच्या किरकोळ बाजारात उतरणार आहे व त्यासाठी अनिवासी भारतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती वॉलमार्ट करणार आहे. या अधिकारी व कर्मचाºयांना विदेशातील शिस्तबद्ध काम करण्याचा अनुभव असतो व त्यांना भारतातील बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान असते त्यामुळे वॉलमार्टने अनिवासी भारतीयांकडे मोर्चा वळविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वॉलमार्ट अनिवासी भारतीयांची भरती करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 4:26 AM