नवी दिल्ली : फोन-पे, पेटीएम, गुगल-पे, मोबीक्विक यांसारख्या सर्व परवानाधारक प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) किंवा मोबाईल वॉलेटमध्ये आता आर्थिक व्यवहार शक्य होणार आहेत. एकातून दुसऱ्या वॉलेटमध्ये पैसे भरणे किंवा काढणे ही सुविधा ग्राहकांना पुढील वर्षी एप्रिल महिन्यापासून उपलब्ध होईल, असे परिपत्रक रिझर्व्ह बँकेने जारी केले. त्यामुळे डिजिटल बँकिंगच्या विस्तारिकरणालाही मोठा हातभार लागणार आहे. केवायसीचे सर्व निकष पाळणाऱ्या पीपीआय व मोबाइल वॉलेटमध्ये युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय)च्या माध्यमातून हे आंतरव्यवहार होऊ शकणार आहेत.
मोबाइल वॉलेटमधून एकाचवेळी दोन हजार रुपयांपर्यंत पैसे काढता येतील. तसेच मोबाइल वॉलेटमध्ये पैसे ठेवण्याची मर्यादा आता १ लाख रुपयांवरून दोन लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. पीपीआयमध्ये पैसे भरण्यासाठी तसेच रक्कम काढण्यासाठी विशिष्ट मुदत ठरवून देण्यात येईल. त्यामुळे फसवणूक होण्याचे प्रकार टाळता येऊ शकतील, असे रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केले आहे.
तयार केला नवीन नियम
रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार प्रीपेड कार्ड किंवा पेमेंट वॉलेटचा वापर करून एटीएम, मायक्रो-एटीएम किंवा पॉईंट ऑफ सेल डेपो येथूनही ग्राहकाला पैसे काढता येतील. मात्र त्याची सुरुवात एप्रिल महिन्यातच होणार आहे.