नवी दिल्ली: ई-कॉमर्सच्या दुनियेतील वॉलमार्ट व फ्लिपकार्ट यांच्यातील बहुचर्चित खरेदी व्यवहारावराची बुधवारी अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली. त्यानुसार वॉलमार्टने 16 अब्ज डॉलर्स इतकी रक्कम मोजून फ्लिपकार्टमधील 77 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. भारतामध्ये असलेल्या संधीचा विचार करता ही बाजारपेठ जगातल्या सगळ्यात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. भारतातल्या ई-कॉमर्सच्या बाजारपेठेमध्ये आमूलाग्र परीवर्तन घडवणाऱ्या फ्लिपकार्टमध्ये भागीदारी मिळण्याची संधी आमच्यासाठी महत्त्वाची आहे, अशी भावना वॉलमार्टचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांनी व्यक्त केली आहे.
फ्लिपकार्टसोबतच्या या व्यवहारासाठी वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाऊज मॅकमिलन भारतात आले होते. वॉलमार्ट ही जगातील रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. तर फ्लिपकार्ट ही भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. या दोन कंपन्यांमध्ये तब्बल 15 बिलियन अमेरिकन डॉलर्सचा व्यवहार होणार आहे. यामुळे वॉलमार्ट ही कंपनी भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करेल.
अॅमेझॉनमध्ये काम करताना सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांना फ्लिपकार्टची कल्पना सुचली. यातूनच पुढे फ्लिपकार्टचा जन्म आणि विस्तार झाला. यानंतर पुढे अॅमेझॉननंदेखील भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल ठेवले. फ्लिपकार्टनं अॅमेझॉनला चांगली टक्कर दिली. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये फ्लिपकार्टचं महसुली उत्पन्न घटले होते.
कोण आहेत बन्सल?
सचिन बन्सल व बिन्नी बन्सल हे दोघे आयआयटीअन मित्र आहेत. कंपनी सुरू करण्याआधी ते आॅनलाइन पुस्तक विक्री करायचे. त्यातून त्यांना ‘फ्लिपकार्ट’ची कल्पना सुचली. छोट्या फ्लॅटमधून सुरू केलेल्या कंपनीचा आवाका आज ८५ हजार कोटींच्या घरात गेला आहे.
‘मेक इन इंडिया’वर भर
पुढील काळात ‘फ्लिपकार्ट’वर विक्री होणाऱ्या अधिकाधिक वस्तू या ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतातील छोट्या उत्पादक व विक्रेत्यांच्या असतील. त्यांना निर्यातीसाठी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन वॉलमार्टचे सीईओ डग मॅकमिलन यांनी दिले. ‘फ्लिपकार्ट’चे सह संस्थापक बिन्नी बन्सल कंपनीचे सीईओ असतील. अन्य काही भागीदारांचे प्रतिनिधीही संचालक मंडळात कायम राहतील.
‘अॅमेझॉन’ला स्पर्धेची भीती
भारतीय आॅनलाइन बाजारात आतापर्यंत वॉलमार्ट नगण्य होते. या व्यवहारानंतर वॉलमार्ट-फ्लिपकार्टचा भारतीय बाजारातील हिस्सा ८० टक्क्यांच्या घरात जाईल. यामुळे दुसºया क्रमांकावरील ‘अॅमेझॉन’ या अन्य अमेरिकन कंपनीसमोर मोठी स्पर्धा असेल. भारतीय आॅनलाइन बाजाराची उलाढाल दशकभरात १३.२० लाख कोटींच्या घरात असेल. त्यामुळे ‘फ्लिपकार्ट’ खरेदी व्यवहाराचा सर्वच कंपन्यांना फायदा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.