Join us

Walmart Cuts 200 Jobs : 'वॉलमार्ट'नं एका झटक्यात 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं; सांगितलं 'हे' मोठं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 8:08 PM

Walmart Cuts 200 Jobs : वॉलमार्टने ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, त्यात डिलिव्हरी (Last Mile Delivery)आणि मर्चेंडाइजिंग  (Merchandising) विभागांशी संबंधित कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : आर्थिक मंदीचा (Recession) फटका जगभरातील कंपन्याना बसताना दिसून येत आहे. यासोबतच महागाईत (Inflation) सातत्याने होणारी वाढ ही दुहेरी मार देणारी ठरत आहे. त्यांचा परिणाम सर्वत्र दिसू लागला आहे. ताजे उदाहरण म्हणजे रिटेल कंपनी वॉलमार्टने ( Walmart) आपल्या 200 कर्मचाऱ्यांना झटक्यात बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, वॉलमार्ट इंक (Walmart Inc.) कंपनीला वाढत्या खर्चाचा आणि कमकुवत मागणीचा सामना करावा लागत असल्याने कंपनी जवळपास 200 कॉर्पोरेट नोकऱ्या कमी करत आहे. वॉलमार्टने ही कर्मचाऱ्यांची कपात कंपनीची स्थिती सुधारण्यासाठी आणि भक्कम भविष्यासाठी उचललेले पाऊल असल्याचे म्हटले आहे.

वॉलमार्टने ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, त्यात डिलिव्हरी (Last Mile Delivery)आणि मर्चेंडाइजिंग  (Merchandising) विभागांशी संबंधित कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यासंदर्भात, कंपनीने बुधवारी एक ईमेल पाठवला आहे. यात आम्ही आमच्या स्ट्रक्चरला अपडेट करत आहोत आणि एक  मजबूत भविष्यासाठी कंपनीसाठी स्पष्टता आणि निवडक भूमिका विकसित करत आहोत, असे म्हटले आहे. दरम्यान, वॉलमार्टच्या शेअर्समध्ये यावर्षी आतापर्यंत 9.8 टक्क्यांची घसरण झाली आहे.

वॉलमार्टमध्ये 16 लाख कर्मचारी कार्यरतवॉलमार्ट ही अमेरिकेतील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी नियोक्ता कंपनी आहे आणि सुमारे 16 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. नियामक फाइलिंगनुसार, वॉलमार्टच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी 100,000 पेक्षा जास्त मॅनेजमेंट आणि प्रोफेशनल कर्मचारी आहेत. कंपनीने केलेल्या या कर्मचारी कपातीची माहिती वॉल स्ट्रीट जर्नलच्या हवाल्याने छापण्यात आली आहे.

इतर कंपन्याही कर्मचारी कपातीच्या मार्गावरअलीकडेच अॅमेझॉननेही आपल्या कर्मचाऱ्यांची एक लाखांची कपात केली होती. त्याचवेळी वॉलमार्टनंतर इतरही अनेक बड्या कंपन्या असे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. रिपोर्टनुसार, आर्थिक घडामोडी कमी होण्याच्या वाढत्या चिंतेमुळे Ford Motor जवळपास  8,000 कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. तर फेसबुकची (Facebook) मूळ कंपनी Meta Platforms Inc. ने देखील नोकरभरतीत 30 टक्के कपात करण्याची योजना आखली आहे. याशिवाय, गुगलने (Google)  नोकरभरतीची गती कमी केली आहे. 

टॅग्स :व्यवसायकर्मचारी