नवी दिल्ली : वॉल्ट डिस्नेची डिस्ने इंडिया ही कंपनी आपल्या काही दूरचित्रवाहिन्यांचे भारतातील प्रक्षेपण आगामी काळात थांबविण्याची शक्यता आहे. तसेच त्यांचा फिल्म स्टुडिओ, क्रीडा क्षेत्रातील व्यवसाय यांनाही कात्री लागण्याची शक्यता आहे.
या कंपनीचे आशिया व पॅसिफिक विभागाचे अध्यक्ष उदय शंकर हे या पदावरून पायउतार होत आहेत. कोरोना साथीमुळे जगामध्ये प्रत्येक क्षेत्रातील उद्योगांना आर्थिक फटका बसला आहे. त्याला मनोरंजन क्षेत्र व दूरचित्रवाहिन्याही अपवाद नाहीत. डिस्ने-हॉटस्टार या व्हिडिओ स्ट्रिमिंगसाठी लक्ष्मी बॉम्ब, भूज : दी प्राईड ऑफ इंडिया अशा चित्रपटांचे हक्क विकत घेण्यात आले आहेत. आता या सेवेद्वारे प्रेक्षकसंख्या वाढविण्याचे पाऊल डिस्ने इंडियाने उचलल्याचे कळते.
वॉल्ट डिस्नेने टष्ट्वेटी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स कंपनी ७१ अब्ज डॉलरला खरेदी केली होती. हा व्यवहार जून २०१८ मध्ये झाला होता. त्यामुळे भारतात स्टार इंडिया, फॉक्स स्टार स्टुडिओज, हॉटस्टार या गोष्टी वॉल्ट डिस्ने कंपनीच्या मालकीच्या झाल्या होत्या. स्टार वर्ल्ड या चॅनलचे भारतातील प्रक्षेपणही बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
केबल ऑपरेटर उत्पन्नाचा वाटा देत नसल्याचा दावा -
कोरोना साथीच्या काळात भारतातील दूरचित्रवाहिन्यांची अवस्था आर्थिकदृष्ट्या नाजूक झाली आहे. त्यामुळे काही वाहिन्यांचे प्रक्षेपण थांबविण्यापासून ते कर्मचारी कपात करण्यापर्यंत पावले उचलली जात आहेत.
केबल ऑपरेटर, मल्टिपल सिस्टीम ऑपरेटर (एमएसओ) हे पे चॅनलमधून मिळणाऱ्या उत्पन्नातील वाटा दूरचित्रवाहिन्या चालविणाऱ्यांना देण्यास तयार नाहीत. त्यामुळेच दूरचित्रवाहिन्यांच्या आर्थिक संकटात भर पडली असल्याचे सांगण्यात आले.