केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आता आणखी ७५ लाख नवीन कनेक्शन देणार असल्याचे जाहीर केले आहेत, यामुळे आता देशातील सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सरकारने उज्ज्वला २.० योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार महिलांना ७५ लाख मोफत एलपीजी कनेक्शन देणार आहे. येत्या तीन वर्षांत महिलांना ही गॅस जोडणी दिली जाणार आहेत. मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर देशातील पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या १०.३५ कोटी होणार आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मोदी सरकारने २०१६ मध्ये सुरू केली होती. गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील महिलांनाही एलपीजी सिलिंडरचा लाभ मिळावा, हा या योजनेचा उद्देश होता. या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळते.
१,६५० कोटी रुपयांचा निधी
उज्ज्वला २.० योजनेअंतर्गत देशभरातील ७५ लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यासाठी सरकारने एकूण १,६५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या योजनेवर येणारा खर्च संपूर्णपणे केंद्र सरकार करणार आहे. यापूर्वी महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने राखी आणि ओणमच्या मुहूर्तावर स्वस्तात एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा केली. सरकारने सर्वसामान्य ग्राहकांसाठी एलपीजी सिलिंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. या २०० रुपयांव्यतिरिक्त, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत प्रति सिलिंडर अतिरिक्त २०० रुपयांची सूट मिळणार आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना ४०० रुपयांनी स्वस्त सिलिंडर मिळणार आहे.
खासकरून दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ फक्त बीपीएल कार्डधारकांनाच मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. यासोबतच तुमचे कौटुंबिक उत्पन्न २७,००० रुपयांपेक्षा कमी असावे.
या योजनेसाठी अर्ज असा करा
जर तुम्हालाही पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर https://popbox.co.in/pmujjwalayojana/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
या वेबसाईटवर जा आणि डाउनलोड फॉर्म पर्याय निवडा. यानंतर, एक फॉर्म दिसेल, तो डाउनलोड करा आणि त्यात विचारलेली सर्व माहिती भरा.
तो फॉर्म तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीकडे जमा करा. तसेच रेशन कार्ड, फोटो, मोबाईल नंबर इत्यादी आवश्यक कागदपत्रे यासोबत जोडा. कागदपत्रे पडताळणीनंतर तुम्हाला नवीन कनेक्शन मिळेल.