१ फेब्रुवारी २०२१ रो रोजी जो अर्थसंकल्प सादर केला गेला त्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक मुद्दे ठळकपणे सादर केले. त्यातील काही मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
- पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधांवर अधिक भर देणं.
- सार्वजनिक क्षेत्रातून मिळणारे उत्पन्न.
- सार्वजनिक क्षेत्र उदाहर्णार्थ बीपीसीएल, एअर इंडिया इत्यादिंच्या निर्गुतवणूकीवर भर देणं.
- सामान्य माणसासाठी दिलासादायक बाब म्हणजे शासनानं कर प्रणालीतर कोणीतेही बदल केले नाहीत.
या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे शेअर बाजारानं एक उच्चांक गाठला आहे. हा अर्थसंकल्प ज्यामध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा आणि निर्गुतवणूकीवर जो भर देण्यात आपण सर्वांनी १९९१ मध्ये मध्ये अर्थकारणात जे उदारीकरणाचे धोरण अवलंबले होते त्याची आठवण करून देणारा आहे. अशाप्रकारचा अर्थसंकल्प हा बाजारामध्ये तेजी निर्माण करून शेअर बाजार त्याच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचवतो आणि त्यामुळे गुंतवणूकदार शेअर्समध्ये स्वत:ला गुंतवणूक करण्यापासून रोखू शकत नाही.
गुंतवणूकदारांना गुंतवणूक वाढवण्याचा मोह आवरता येत नाही
अर्थसंकल्पानंतर शेअर बाजाराच्या निर्देशांकानं उच्चांक गाठला आहे. अशातच अनेक जण या विचारात असतील की आपणही शेअर बाजारात गुंतवणूक करून काही ना काही नफा तरी मिळवू. शेअर बाजार हा वाटतो तितका सोपाही नाही. शेअर बाजार हा बऱ्यापैकी अस्थिर आहे. जसा तो वर जातो तसाच आणि किंबहुना त्याच वेगानं तो खालीही येऊ शकतो. सर्वप्रथम गुंतवणूक करण्यासाठी तुमचा स्वत:वरचा विश्वास, आर्थिक परिस्थिती आणि आर्थिक नुकसान झाल्यास ती पचवण्याचीही क्षमता याची तयारी ठेवणं आवश्यक आहे. जर तुमची आर्थिक परिस्थिती आणि संकट पचवण्याची क्षमता याची माहिती असेल तरच तुम्ही बाजारातील समभागात गुंतवणूक करू शकता
शेअर मार्केटच्या अभ्यासाबाबत जागरूकता ठेवा
कोणाच्याही दुसऱ्याच्या मतांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वत: काही मुलभूत पुस्तकांचं वाचन करून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. यासाठी वॉरेन बफेट, बेंजामिन ग्रॅहम यांच्यासारख्यांची काही पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा. ही पुस्तकं समजण्यास सोपीही आहेत. आर्थिक नियोजनाचा यामुळे फार फायदा होऊ शकतो. आर्थिक नियोजनाबद्दल माहिती असेल तर तुमची फसवणूक होण्याची शक्यताही कमी असते. पैसा कसा काम करतो हे ओळखणं महत्त्वाचं आहे आणि ही सर्वात पहिली पायरीही आहे. जेणेकरून तुमचाच पैसा तुमच्याच कमाईचं साधनही ठरेल.
आकस्मिक संकटासाठी तयार राहा
सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे तुमचा मासिक खर्च म्हणजे अगदी मोठ्या खर्चापासून छोट्या खर्चापर्यंत सर्व लिहून ठेवा. जेव्हा तुम्हाला खर्च कळेत त्याच्या सहा पट रक्कम ही तुमची आकस्मिक ठेव असेल. कमीतकमी तेवढी रक्कम तुम्ही एक सुरक्षित गुंतवणूकदार म्हणू ठेवली पाहिजे.
शेअर बाजाराची स्थिती काही असली तरी ध्येयावर लक्ष हवं
अशा बऱ्याच व्यक्ती आहेत ज्या शेअर बाजारात तेजी आणतात. याव्यतिरिक्त अर्थसंकल्पासारखे काही घटकही शेअर बाजारात तेजी किंवा घसरण आणण्यास कारणीभूत ठरू शकतात. गेल्या वर्षी जगभरात कोरोनाच्या महासाथीनं हाहाकार माजवला होता. शेअर बाजारात तेजी असो किंवा नसो पण अशा परिस्थितीतही गुंतवणूकदार म्हणून आपली गुंतवणूक सुरूच राहिली पाहिजे. शेअर बाजारातील तेजी आणि मंदी यालाच आपण अस्थिरता असंही म्हणतो. अशा परिस्थितीत गुंतवणूकीचा एक उत्तम पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड्स. परंतु यातही तुम्हाला जोखीम पत्करूनच गुंतवणूक करावी लागेल.
दीर्घकालीन गुंतवणूकीचा विचार करा
गुंतवणूक करताना तुम्हाला दीर्घकालीन विचार करणंही आवश्यक आहे. सुरूवातीला थो़ड्या प्रमाणात गुंतवणूक करा आणि प्रसिद्ध पाश्चात्य म्हण आहे त्याप्रमाणे Fill it, Shut it and forget it. दर महिन्याला छोटीशी गुंतवणूक करा आणि तुमचे ध्येय गाठेपर्यंत ती काढू नका. परंतु एका ठराविक कालावधीनंतर म्हणजेच सहा-सहा महिन्यांची त्याची प्रगतीही पाहणं आवश्यक आहे. चक्रवाढ व्याजाचा फायदा किती चांगल्या प्रकारे होऊ शकतो हे दर महिन्याला छोटी गुंतवणूक करू पाहिल्यानंतर आश्चर्य वाटेल. यात नव्या आणि तरूण गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की हे अर्थसंकल्प सादर करताना सरकारनं पुढील तीन ते चार वर्षांकरिता सरकारी खर्च, निर्गुंतवणूक आणि कर शासन यासाठी बऱ्याच पर्यायांची तरतूद केली आहे. बाजारातील हालचालींनी चलबिचल न होता तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. वरील सर्व पर्याय लक्षात घेता दीर्घकालीन गुंतवणूक ही तुमच्या बाजूनंच राहते. तुमच्या जोखीम पत्करण्याच्या क्षमतेप्रमाणे गुंतवणूक करा आणि बाजाराच्या प्रत्येक बगलणाऱ्या पावलासोबत तुमचा पोर्टफोलिओ बदलण्याचा प्रयत्न करू नका. दीर्घकालीन गुंतवणूक हा सर्वात उत्तम पर्याय आहे.
(हा लेख माय वेल्थ ग्रोथ डॉट कॉमचे सहसंस्थापक हर्षद चेतनवाला यांनी लिहिला आहे)