Join us

घर घ्यायचे आहे? करा फक्त क्लिक, महारेराकडून क्यूआर कोड आता अत्यावश्यक  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 7:37 AM

सर्व जाहिरातींसोबत महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्याच बाजूला ठळकपणे  क्यूआर कोड असणे अत्यावश्यक राहणार आहे.

मुंबई : मार्चपासून महारेराकडे नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी पत्रासोबतच प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले क्यूआर कोडही देण्यास सुरुवात झाली आहे. नोंदणीकृत जुन्या प्रकल्पांनाही महारेराने क्यूआर कोड उपलब्ध करून दिले असून, आता १ ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व जाहिरातींसोबत महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्याच बाजूला ठळकपणे  क्यूआर कोड असणे अत्यावश्यक राहणार आहे.

बिल्डर आपल्या गृहनिर्माण प्रकल्पात जास्तीतजास्त गुंतवणूक व्हावी, यासाठी वर्तमानपत्रे,  इलेक्ट्रॉनिक माध्यमे, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲपवर प्रकल्पाच्या जाहिराती करीत असतात. कुठलेही  माध्यम वापरून केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये आता महारेरा क्रमांक आणि महारेरा संकेतस्थळासोबतच क्यूआर कोडही ठळकपणे  दर्शविणे, छापणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कोडमुळे घर खरेदीदारांना प्रकल्पाशी सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

काय माहिती मिळणार?

  • प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी पूर्ण होणे अपेक्षित आहे, प्रकल्प कधी नोंदविला गेला, प्रकल्पाविरुद्ध काही तक्रारी आहेत का,  प्रकल्पाच्या विविध मंजुऱ्या, प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रकल्पाच्या मंजूर आराखड्यात काही बदल केला का, प्रकल्पाच्या नोंदणीचे नूतनीकरण केले का... असा सर्व तपशील  उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्राहकाला निर्णय घ्यायला मदत होणार आहे.
  • प्रकल्पाची सद्यस्थिती आणि एकूण खर्च आणि बाकीचे तपशीलही उपलब्ध होत असून, हे सर्व या कोडमुळे येथून पुढे घरबसल्या पाहता येणार आहेत.
टॅग्स :महाराष्ट्र