प्रॉपर्टीच्या वाढत्या किमतींमुळे तुम्ही त्रस्त असाल तर बँक लिलावाच्या माध्यमातून कमी किंमतीत घर खरेदी करू शकता. बँक लिलावाद्वारे प्रॉपर्टी खरेदी करणं ही एक उत्तम डील वाटू शकते, परंतु त्यात बरीच जोखीम आणि आव्हानं देखील आहेत. खरेदीदारांनी कायदेशीर आणि आर्थिक समस्या टाळून व्यवहार केल्याची खात्री करणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला बँक लिलावातून खरेदी केलेल्या प्रॉपर्टींमध्ये कोणत्या समस्या उद्भवू शकतात याबद्दल माहिती देणार आहोत.
फायदे काय?
बँकेच्या लिलावात प्रॉपर्टी खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्याला चांगली सूट मिळते. बँका लिलावात मालमत्ता बाजारभावापेक्षा १० ते ३० टक्के सवलतीनं देतात. सरफेसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार होणारी लिलाव प्रक्रिया सहसा पारदर्शक असते. अटी, शर्ती आणि पात्रता सहसा निविदाकारांना अगोदर कळविली जाते. लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरेदीदाराला इतर मालमत्तांच्या तुलनेत येथे लवकर ताबा मिळतो. बँक लिलावात कर्जदारांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी बँकांकडून मालमत्तांची विक्री केली जाते. जेव्हा कर्जदार कर्ज फेडू शकत नाहीत, तेव्हा बँक मालमत्ता जप्त करते आणि त्याचा लिलाव करते. हे कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत घडते.
हे सुरक्षित आहे का?
मालकीहक्कातील अस्पष्टता : काही प्रकरणांमध्ये मालमत्तेचे मालकी हक्क पूर्णपणे स्पष्ट नसतात. उदाहरणार्थ, मालमत्तेशी संबंधित कायदेशीर वाद किंवा मालकीचे प्रश्न असल्यास, लिलावाद्वारे मालमत्ता खरेदी केल्यानंतरही नवीन खरेदीदारास दीर्घ कायदेशीर लढाईला सामोरं जावं लागू शकतं.
थकबाकी आणि दायित्वे : बँक लिलावात विकल्या गेलेल्या सर्व मालमत्ता आर्थिक दायित्वांपासून मुक्त नसतात. अनेकदा मालमत्तांमध्ये थकीत मालमत्ता कर, देखभाल शुल्क किंवा युटिलिटी बिलं येतात जी नवीन मालकाला भरावी लागतात.
ताबा मिळण्यास उशीर : काही वेळा आधीचा मालक मालमत्ता रिकामी करण्यास तयार नसल्यास मालमत्तेचा ताबा मिळविणं आव्हानात्मक ठरू शकतं. जरी कायदेशीर मालकी लिलावातील विजेत्याकडे हस्तांतरित केली गेली तरीही हा अधिकार लागू करण्यासाठी वेळ आणि अतिरिक्त कायदेशीर हस्तक्षेप लागू शकतो.
प्रत्यक्ष तपासणीचा अभाव: काही प्रकरणांमध्ये, खरेदीदारांना बोली लावण्यापूर्वी मालमत्तेची प्रत्यक्ष तपासणी करण्याची परवानगी नसते. यामुळे मालमत्तेची स्थिती, छुपे नुकसान किंवा बेकायदेशीर कब्जा यांच्याशी संबंधित समस्या, ज्या यापूर्वी उघड केलेल्या नसतील अशा समस्या उद्भवू शकतात.