SIP in Mutual Fund : शेअर मार्केटमध्ये हाय रिक्स घेण्यापेक्षा कमी जोखमीत चांगला परताव्यासाठी गुंतवणूकदार आता म्युच्युअल फंडाकडे वळत आहे. म्युच्युअल फंड एसआयपी आता सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. कमी उत्पन्न गटातील लोकही लोक आता एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असल्याचे आकडेवारीवरुन समोल आलं आहे. जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी चांगल्या गुंतवणुकीचा पर्याय शोधत असेल तर म्युच्युअल फंड एसआयपी सारखा चांगला पर्याय नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला २५ वर्षांत १० कोटी रुपयांचा निधी जमा करायचा असेल तर दरमहा किती रुपयांची एसआयपी करावी लागेल?
तुमची गुंतवणूक या 2 मुख्य गोष्टींवर अवलंबून
२५ वर्षांत एसआयपीद्वारे १० कोटी रुपये जमा करण्याचा विचार असेल तर २ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. पहिली म्हणजे तुम्हाला किती परतावा मिळत आहे आणि दुसरा म्हणजे तुम्ही दरमहा किती पैसे गुंतवत आहात. यावर तुमचं सर्व गणित अवलंबून असणार आहे.
१० वर्षांच्या स्टेप-अपसह काम करावे लागणार
जर तुमच्याकडे २५ वर्षांचा कालावधी असेल आणि तुम्हाला १० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करायची असेल तर तुम्ही स्टेप-अपचीही मदत घेऊ शकता. म्हणजे तुम्ही २४००० रुपयांची एसआयपी सुरू करुन दरवर्षी ती १० टक्के स्टेप-अप करत असाल, म्हणजे तुमची एसआयपी रक्कम दरवर्षी १० टक्क्यांनी वाढवली. ज्यावर तुम्हाला दरवर्षी सरासरी १२ टक्के परतावा मिळेल असं गृहित धरलं तर २५ वर्षांत तुम्ही १० कोटी ११ लाख रुपयांचा निधी जमा करू शकता.
१५ टक्के परतावा मिळाला तर दुधात साखर
तुम्हाला २५ वर्षांच्या गुंतवणुकीच्या कालावधीत दरवर्षी सरासरी १५ टक्के परतावा मिळवायचा असेल, तर तुम्हाला २३,००० रुपयांची SIP सुरू करावी लागेल. जी दरवर्षी ५ टक्क्यांनी वाढवत न्यावी लागेल. या गुंतवणुकीच्या धोरणामुळे तुम्ही २५ वर्षांत १०.३१ कोटी रुपयांचा निधी तयार करू शकता.
या गोष्टींची विशेष काळजी घ्या
१० कोटी रुपयांचा निधी जमा करण्याचे लक्ष निश्चित झाल्यास तुम्हाला काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणुकीत आर्थिक शिस्त पाळणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही ठरवलेल्या प्लॅननुसारच गुंतवणूक करत राहणे आवश्यक आहे. यादरम्यान, शेअर बाजारात चढउतार होऊन तुमच्या गुंतवणुकीवरही परिणाम होऊ शकतो. मात्र, दीर्घकालीन गुंतवणूक असणाऱ्यांना ही जोखीम खूप कमी असते.