लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘अराईज’ पुढाकारांतर्गत ‘स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया’कडून (सिडबी) एमएसएमई श्रेणीतील कंपन्यांना (ब्राऊन फील्ड युनिट्स) व्यवसाय वाढविण्यासाठी ७ कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिले जात आहे. या कर्जाचा लाभ उद्योगांना ३१ जुलैपर्यंत घेता येणार आहे.
हे कर्ज प्रामुख्याने सरकारच्या प्राधान्य क्षेत्रातील तसेच उच्चवृद्धी क्षेत्रातील कंपन्यांना दिले जाते. त्यात आयटी, हायड्रोजन इंधन, पेट्रो केमिकल आणि अन्नप्रक्रिया यांसारख्या उगवत्या क्षेत्रांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत ७ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जास मंजुरी दिली जाते. ही रक्कम प्रकल्पाच्या पूर्ण खर्चाच्या ८० टक्के असायला हवी, अशी त्यात अट आहे. या योजनेतील कर्जावर रेपो दरापेक्षा १.५० ते २.८० टक्के अधिक व्याज आकारले जाते. कर्जाची परतफेड ७ वर्षांपर्यंत असून त्यात २ वर्षांचा मोराटोरियम म्हणजे हप्ते न फेडण्याची सवलत मिळते.
अटी काय आहेत?
सिडबीकडून एमएसएमई उद्यमींना अत्यंत किफायतशीर दरात तसेच किमान अटींवर हे कर्ज दिले जाते. हे कर्ज मिळण्यासाठी कंपनी मागील २४ महिन्यांपासून सुरू असायला हवी, मागील लेखापरीक्षणाच्या वित्तीय परिणामांत कंपनीने नफा कमावलेला असावा तसेच कंपनीचा सिबील स्कोअर आणि कॅश मार्जिन रेश्यो चांगला असायला हवा.