Join us  

व्यवसाय सुरू करायचाय... तर आधी हे वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 8:00 AM

व्यावसायिक उद्देश, व्यावसायिक उद्दिष्टे, प्रारंभिक गुंतवणूक आणि व्यवसायाचा कालावधी (अल्पकालीन/दीर्घकालीन व्यवसाय मुदत) या आणि अशा अनेक प्रमुख मुद्यांवर आधारित व्यवसायाची नोंदणी करणे योग्य ठरते.

प्रतीक कानिटकर, चार्टर्ड सेक्रेटरी

जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख झाली आहे. त्यात सेवा उद्योगाचे प्रमुख योगदान आहे. भारतातील वैविध्यपूर्ण बाजारपेठेत अधिक सुलभता प्रदान करून थेट विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे अनेक भारतीय व्यावसायिक या संधीचा फायदा करून घेण्यासाठी व्यवसायात उतरत आहेत. नवउद्योजक जेव्हा व्यवसाय सुरू करतात तेव्हा त्यांच्या समोर अनेक व्यावसायिक प्रश्न उपस्थित होतात.

जसे व्यावसायिक कल्पनेला मूर्त आकार देणे, त्यांच्या ‘बिझिनेस व्हिजन’वर विश्वास ठेवणारी टीम तयार करणे, उत्पादन विकसित करणे, गुंतवणूकदारांना भेटणे, त्यांच्या प्रॉडक्ट अथवा सर्व्हिससाठी योग्य बाजारपेठ शोधणे इत्यादी. संबंधित प्रश्नावलीमध्ये, नेमक्या कोणत्या प्रकारात आपल्या व्यवसायाची नोंदणी केली पाहिजे, हा प्रश्न बरेचदा अग्रस्थानी नसतो आणि त्याचमुळे ‘कंपनी’ हा शब्द अनेकदा कायदेशीर बाबींमध्ये व्यवसायाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरला जातो; पण नेमक्या कोणत्या प्रकारात आपला व्यवसाय रजिस्टर्ड आहे, त्याचे नेमके फायदे व तोटे काय, हे व्यावसायिकांना तितकेसे माहिती नसते.

व्यावसायिक उद्देश, व्यावसायिक उद्दिष्टे, प्रारंभिक गुंतवणूक आणि व्यवसायाचा कालावधी (अल्पकालीन/दीर्घकालीन व्यवसाय मुदत) या आणि अशा अनेक प्रमुख मुद्यांवर आधारित व्यवसायाची नोंदणी करणे योग्य ठरते.

एकमेव मालकी असलेला व्यवसाय (प्रोप्रायटरी कन्सर्न) : सोल प्रोप्रायटरशिप कन्सर्न ही त्याच्या मालकापेक्षा वेगळी कायदेशीर संस्था नसते, म्हणजेच त्या व्यवसायाचा वेगळा पॅन नंबर नसतो.  

भागीदारी फर्म (पार्टनरशिप फर्म) : दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन तो व्यवसाय  नफा/तोटा वाटणी तत्त्वावर चालवतात व त्या फर्मची वेगळी कायदेशीरपणे नोंदणी केली जाते, म्हणजेच त्या व्यवसायाचा वेगळा पॅन नंबर असतो. 

मर्यादित दायित्व भागीदारी (एलएलपी) : पार्टनरशिप ज्याअंतर्गत    व्यावसायिक लायबिलिटी मर्यादित राहतात, वैयक्तिक पार्टनरची मालमत्ता व्यावसायिक लायबिलिटीसाठी संलग्न हाेत नाही.

एक व्यक्ती कंपनी (वन पर्सन कंपनी) : प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये केवळ एकच व्यक्ती डायरेक्टर व शेअर होल्डर असू शकते.खासगी मर्यादित संस्था (प्रायव्हेट लिमिटेड कंपनी) : किमान दोन व्यक्ती डायरेक्टर व शेअर होल्डर घेऊन स्थापन केलेली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. या प्रकारातदेखील शेअर होल्डर मालमत्ता व्यावसायिक लायबिलिटीसाठी संलग्न करता येत नाही.  

सार्वजनिक मर्यादित कंपनी (पब्लिक लिमिटेड कंपनी) : पब्लिक लिमिटेड कंपनी मर्यादित दायित्व असलेली कंपनी असते. ज्याचे शेअर्स कोणतीही व्यक्ती खासगीपणे (IPO) प्रारंभिक सार्वजनिक ऑफरद्वारे किंवा शेअर बाजारातील व्यवहारांद्वारे विकत घेऊ शकतो.

टॅग्स :व्यवसायपैसाबँक