Join us

परदेशात शिकायचेय... काढा कर्ज, पकडा विमान; सुलभ प्रक्रियेमुळे ५ वर्षांत लाभार्थींचा ओढा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 11:00 AM

मागच्या वर्षी हा आकडा ९६,८५३ कोटी रुपये इतका होता. 

नवी दिल्ली : यंदा एप्रिल ते ऑक्टोबर या काळात विविध बँकांकडून शैक्षणिक कर्ज घेणाऱ्यांची संख्या २०.६ टक्के वाढली आहे. या काळात १,१०,७१५ कोटी रुपयांचे शैक्षणिक कर्ज देण्यात आले. मागच्या वर्षी हा आकडा ९६,८५३ कोटी रुपये इतका होता. 

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, मागील ५ वर्षांत शैक्षणिक कर्जात  वेगाने वाढ झाली आहे. मागील १ वर्षात लोकांनी विदेशात शिक्षण घेण्यासाठी ४० लाख ते ६० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. एकूण कर्जाच्या तुलनेत हा आकडा ६५ टक्के आहे. 

अमेरिकेत शिकण्यासाठी घेतले सर्वाधिक कर्ज

अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी सर्वाधिक कर्ज घेण्यात आले आहे. अमेरिकी दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत १.४० लाख भारतीयांना विद्यार्थी व्हिसा जारी करण्यात आला. यातील बहुतांश विद्यार्थी शैक्षणिक कर्ज घेऊन शिक्षण घेत आहेत.

प्रमाण सातत्याने का वाढतेय?

कर्ज घेण्याची प्रक्रिया सोपी केल्याने घेण्याचे प्रमाण वाढले आहे. वित्तीय संस्थाही यात सक्रिय झाल्या आहेत. काही वित्तीय संस्था विना तारण ५० लाखांपर्यंत कर्ज देतात. मंजुरी घरबसल्या होते. केवायसीसाठीसुद्धा कुठे जाण्याची गरज नसते. मंजुरीनंतर रक्कम खात्यात तातडीने जमा होते. शैक्षणिक कर्जात वित्तीय संस्थांची वृद्धी १००% आहे.

 

टॅग्स :शिक्षण