PAN Card : देशात आधारकार्ड इतकेच पॅनकार्डचेही महत्त्व वाढले आहे. पॅनकार्डशिवाय तुमचे कोणतेही आर्थिक काम पूर्ण होऊ शकत नाही. बँक खाते, क्रेडिट कार्ड, बँक कर्ज, म्युच्युअल फंड आणि शेअर ट्रेडिंग यासारख्या सर्व आर्थिक व्यवहारांसाठी पॅन क्रमांक आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्डनंबर नसेल तर तुमची सर्व महत्त्वाची कामे अडकू शकतात. पॅनकार्ड आर्थिक व्यवहारांसाठी वापरले जात असताना तुम्ही तुमचा पॅन नंबर काळजीपूर्वक वापरायला हवा. अन्यथा नंतर पश्चाताप करण्यावाचून पर्याय राहणार नाही.
पॅनकार्डसोबत निष्काळजीपणा पडू शकतो महागातबहुतेक लोक पॅनकार्डबाबत गंभीर नसल्याचे समोर आले आहे. लोक त्यांचा पॅन नंबर कोणत्याही व्यक्तीशी शेअर करतात. मात्र, याचे परिणाम इतके घातक असू शकतात की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. सायबर गुन्हेगार तुमच्या पॅन नंबरवरून बनावट कर्ज, क्रेडिट कार्ड यासारख्या गोष्टी घेऊ शकतात. काही दिवसांपूर्वीच एका व्यक्तीच्या नावावर तब्बल दीड कोटी रुपयांचे कर्ज काढल्याचा प्रकार घडला होता.
तुमच्या नावावर काढलेले कर्ज तुम्हालाच भरावे लागेलसमजा तुम्ही तुमचा पॅन नंबर एखाद्यासोबत शेअर केला. किंवा कोणीतरी पॅन नंबरचा गैरवापर करून तुमच्या नावावर कर्ज घेतले, तर अशा परिस्थितीत हे कर्ज फेडण्याची जबाबदारी तुमच्यावर येते. जर कोणी तुमचा पॅन क्रमांक वापरून क्रेडिट कार्ड घेतले असेल तर या क्रेडिट कार्डचे बिलही तुम्हालाच भरावे लागेल. यामुळे तुम्ही तुमचा पॅन अतिशय काळजीपूर्वक वापरला पाहिजे.
क्रेडिट स्कोअर तपासताना कळेल पॅनचा वापरतुमच्या पॅन कार्डवरून कोणी कर्ज घेतलं आहे का? किंवा किती क्रेडिट कार्ड जारी केले आहेत. याची माहिती तुम्ही घरबसल्या तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा क्रेडीट स्कोअर तपासावा लागेल. आर्थिक तज्ञ वेळोवेळी CIBIL किंवा क्रेडिट स्कोअर तपासण्याची शिफारस करतात. क्रेडिट स्कोअर तपासताना तुमच्या पॅनवरील सर्व कर्ज तुम्हाला पाहायला मिळतात.
गैपप्रकार आढळल्यास तक्रार नोंदवातुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे बनावट कर्ज किंवा क्रेडिट कार्ड आढळल्यास, तुम्ही कोणताही विलंब न करता त्वरित तक्रार नोंदवावी. तुम्ही तुमच्या पॅन नंबरच्या गैरवापराची तक्रार पोलीस तसेच तुमच्या बँक आणि आयकर विभागाकडे करू शकता. तक्रार दाखल करण्यास तुम्ही जितका उशीर कराल तितका मोठा त्रास तुम्हाला होईल.