Service Sector PMI : गेल्या ३ महिन्यात शेअर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. सप्टेंबर २०२४ मध्ये बाजार ऐतिहासिक उच्चांकावर होता. तर अलीकडील काही दिवसात बाजाराने दोनतीन वेळा नीचांकी पातळीवर घसरला आहे. आता तर भारतीय अर्थव्यवस्थेत सुमारे ४० टक्के योगदान देणाऱ्या सेवा क्षेत्राची वाढ जानेवारीमध्ये २ वर्षांतील नीचांकी पातळीवर गेली. ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घोक्याची घंटा आहे. त्याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. HSBC इंडिया सर्व्हिसेस बिझनेस ॲक्टिव्हिटी इंडेक्सने डेटा प्रसिद्ध केला आहे.
पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्सच्या (पीएमआय) भाषेत सांगायचं झालं तर ५० पेक्षा जास्त स्कोअर म्हणजे व्यवहारात गती तर ५० पेक्षा कमी स्कोअर म्हणजे मंदी असा सरळ अर्थ आहे. एचएसबीसीच्या अहवालानुसार, सेवा क्षेत्राचा जानेवारीत वाढीचा वेग मंदावला आहे. व्यावसायिक घडामोडी आणि नवीन व्यवसायांचे पीएमआय निर्देशांक अनुक्रमे नोव्हेंबर २०२२ आणि नोव्हेंबर २०२३ पासून त्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत.
परदेशी विक्रीत वाढ
सेवा क्षेत्राच्या पीएमआयमध्ये घसरण झाली असली तरी विदेशी विक्री आणि ऑर्डरमध्ये वाढ आहे. एकूण नवीन ऑर्डरच्या ट्रेंडच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय विक्री वेगाने वाढली. सर्वेक्षण केलेल्या लोकांनी आशिया, युरोप, पश्चिम आशिया आणि अमेरिकेतील ग्राहकांचा फायदा घेण्याबाबत सांगितले. येथे विस्ताराचा एकूण दर ५ महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. नवीन निर्यात व्यापारात किरकोळ घट झाली. परंतु, २०२४ च्या शेवटी घसरणीतून सावरणे सुरूच ठेवले.
२० वर्षातील रोजगारामध्ये सर्वात जलद वाढ
सर्वेक्षणानुसार, नवीन व्यवसायात सतत सुधारणा आणि वाढत्या क्षमतेमुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. परिणामी आर्थिक तिमाहीच्या सुरुवातीला अतिरिक्त कर्मचारी भरती करण्याची वेळ आळी. पूर्णवेळ आणि अर्धवेळ पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. डिसेंबरमध्ये रोजगार निर्मितीचा वेग वाढला असून डिसेंबर २००५ मध्ये डेटा संकलन सुरू झाल्यापासून सर्वात जलद वाढ झाली. याचा अर्थ रोजगार निर्मितीचा आकडा गेल्या २० वर्षांतील सर्वात वेगवान आहे.
कंपन्यांच्या खर्चात वाढ
सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या खर्चात अतिरिक्त वाढ झाली आहे. याची अनेक कारणे आहेत. मुख्यत: वाढत्या कर्मचाऱ्यांच्या खर्चासह त्यांना लागणाऱ्या गोष्टींच्या किमती वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. वाढत्या खर्चाचा बोजा आणि मागणीतील लवचिकता यांचा परिणाम म्हणून २०२५ च्या सुरुवातीला भारतीय सेवांच्या तरतुदीसाठी आकारण्यात येणाऱ्या किमती आणखी वाढणार आहेत. भारताचा खाजगी क्षेत्राचा विकास दर जानेवारीमध्ये थोडा कमी झाला. HSBC इंडिया कंपोझिट आउटपुट इंडेक्स डिसेंबरमधील ५९.२ वरून १४ महिन्यांच्या नीचांकी ५७.७ वर आला. हा अहवाल S&P Global ने सुमारे ४०० सेवा क्षेत्रातील कंपन्यांकडून मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारे तयार केला आहे.