जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत असलेले आणि जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेंनी तब्बल सहा वर्षांनी पैसे खर्च केले आहेत. जगातील अब्जाधीश या काळात एवढे व्यवहार करत होते, परंतू बफेंना हवी तशी डील मिळत नव्हती. अखेर त्यांना ती संधी मिळाली. खर्चच होत नसल्याने Berkshire Hathaway या कंपनीकडे तुफान पैसा जमला होता, नुकतीच या कंपनीने मोठी डील केली आहे, तरी देखील या कंपनीकडे भरपूर पैसा उरला आहे.
Warren Buffett चा कॉपीकॅट! हुबेहूब नक्कल करून अब्जाधीश बनला हा एनआरआय इन्व्हेस्टर; जाणून घ्या कोण...
बफे यांच्या कंपनीने सोमवारी एक डील केली. या डीलनुसार Berkshire Hathway 11.6 अब्ज ड़ॉलर्समध्ये Alleghany Corp ची खरेदी करणार आहे. या कंपनीकडे ट्रांसअटलांटिक होल्डिंग्स इंकची मालकी आहे. ही एक रीइन्शुरन्स कंपनी आहे. बफेंच्या भात्यात आधीपासून देखील अनेक इन्शुरन्स कंपन्या आहेत. नव्या डीलमुळे बफेंच्या या सेक्टरमधील साम्राज्याला आणखी बळ मिळणार आहे.
बर्कशायर हे अलेघनीचे कायमचे घर असेल. 60 वर्षांपासून अलेघनीचे कामकाज जवळून पाहत होतो, असे बफे यांनी म्हटले आहे. या करारापूर्वी, बफेंची कंपनी सुमारे 6 वर्षे कोणतीही मोठी गुंतवणूक करू शकली नाही. यामुळे बफेंची कंपनी बर्कशायर हॅथवे इंक. कडे 149.2 अब्ज डॉलरचा निधी जमा झाला होता. ब्लूमबर्ग डेटानुसार, बफेंच्या कंपनीकडे 12 तिमाही किंवा तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून $100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रोकड पडून होती.
ब्लूमबर्गच्या मते, वॉरन बफे यांची सध्या $126 अब्ज संपत्ती आहे आणि ते जगातील 5व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. बर्कशायर हॅथवे कंपनीत बफे यांचा सर्वात मोठा हिस्सा आहे. बर्कशायर कंपनीच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्त्रोतांमध्ये इतर कंपन्यांच्या समभागांचा समावेश होतो. कोका कोला, अमेरिकन एक्स्प्रेस, ऍपल, बँक ऑफ अमेरिका यांसारख्या कंपन्यांमध्ये त्याचा मोठा हिस्सा आहे. बर्कशायरचे बाजार मूल्य 1965 पासून वार्षिक 20 टक्के चक्रवाढ दराने वाढले आहे.