Join us

घड्याळ, फ्रीज बनवणाऱ्या कंपनीने बनवल्या पहिल्या लोकसभेतील मतपेट्या; असा झाला शेवट...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 4:16 PM

1952 मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत वापर करण्यात आलेल्या मतपेट्या याच भारतीय कंपनीने तयार केल्या होत्या.

Lok Sabha Election 2024: सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, 19 एप्रिल ते 1 जूनदरम्यान मतदान होईल, तर 4 जून रोजी निकाल लागेल. गेल्या काही काळापासून निवडणूक इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनद्वारे (EVM) घेतल्या जातात. पण, EVM येण्यापूर्वी मतपेटीत 'बॅलेट पेपर' टाकून निवडणुका घेतल्या जायच्या. 1952 मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीतदेखील मतपेटीचा वापर करण्यात आला होता. 

या कंपनीने बनवल्या पहिल्या मतपेट्यानिवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या पहिल्या मतपेट्या 1942 मध्ये हैदराबादचे निजाम सरकार आणि मेसर्स ऑलविन अँड कंपनी, यांनी संयुक्तपणे तयार केल्या होत्या. काही दशकांपूर्वी भारतातील घराघरात या कंपनीचे नाव ओळखले जायचे. घड्याळ, रेफ्रिजरेटर, स्कूटर आणि ट्रेनचे डब्बे, अशा विविध क्षेत्रात कंपनीचा विस्तार झालेला होता. मात्र, 1995 मध्ये गैरव्यवस्थापनामुळे ही कंपनी बंद पडली. 

कंपनीची सुरुवात कशी झाली?निजामाचे हैदराबाद सरकार आणि मेसर्स ऑलविन कंपनी यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून 1942 मध्ये त्याची स्थापना झाली. ही सुरुवातीला हैदराबाद ऑलविन मेटल वर्क्स म्हणून ओळखली जायची. हैदराबादच्या स्टेट रेल्वेसाठी अल्बियन CX9 बसेस असेंबल करण्याचे काम ही कंपनी करायची. कंपनीने 1952 मध्ये देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतपेट्यादेखील बनवण्याचे काम केले. पण, 1969 मध्ये गैरकारभाराच्या तक्रारींनंतर राज्य सरकारने कंपनीचा ताबा घेतला. यानंतर ऑलविनने अनेक क्षेत्रात आपला व्यवसाय वाढवला. कंपनीने रेफ्रिजरेटर्सचे उत्पादन सुरू केले आणि लवकरच त्यात यशस्वी झाली.

अनेक व्यवसायात नशीब आजमावलेगोदरेज आणि केल्विनेटरसारखे ब्रँड असूनही ऑलविन देशभरात आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरली. त्यांचे रेफ्रिजरेटर टिकाऊपणा आणि एनर्जी इफिशियन्सीसाठी ओळखली जायची. 1981 मध्ये ऑलविनने जपानच्या Seiko च्या सहकार्याने घड्याळ बाजारातदेखील प्रवेश केला. कंपनीची घड्याळे त्यांच्या आकर्षक डिझाईन आणि विश्वासार्ह यंत्रणेमुळे लवकरच लोकप्रिय झाली. दर्जेदार आणि नाविन्यपूर्णतेच्या जोरावर घराघरात या घडाळांना मान्यता मिळाली. एवढंच नाही, तर ऑलविनने ऑटोमोबाईल्स आणि रेल्वे कोच बिल्डिंगमध्येही पाऊल टाकले. 1983 मध्ये ऑलविनने जपानी कंपनी निसानच्या सहकार्याने हलकी व्यावसायिक वाहने तयार करण्यास सुरुवात केली, परंतु ती यशस्वी झाली नाही. स्कूटर बाजारातही कंपनीला फारसे यश मिळाले नाही.

अशाप्रकारे झाला कंपनीचा शेवट...हळुहळू गैरव्यवस्थापन आणि चुकीच्या निर्णयामुळे कंपनीमध्ये गोंधळ सुरू झाला. कंपनीला बदलत्या काळाशी जुळवून घेता आले नाही. जेव्हा क्वार्ट्ज तंत्रज्ञान वेगाने उदयास येत होते, तेव्हा कंपनीने यांत्रिक घड्याळांमध्ये मोठी गुंतवणूक केली. तसेच सरकारी अधिकाऱ्यांची उदासीनता आणि राजकीय हस्तक्षेपामुळे कंपनीच्या कामकाजावर परिणाम झाला. 1990 च्या दशकात कंपनीचा तोटा वाढला. अखेर 1995 मध्ये कंपनी बंद झाली. कंपनीचे वेगवेगळे विभाग इतर कंपन्यांना विकले गेले. रेफ्रिजरेटर विभाग व्होल्टासने विकत घेतला, तर घड्याळ विभाग बंद करण्यात आला.

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकभारतलोकसभा निवडणूक २०२४