नवी दिल्ली : जगभरात भारताचे ‘आयटी हब’, ‘सिलिकॉन व्हॅली’ अशी स्वतंत्र ओळख बंगळुरू या शहराची आहे. गेल्या काही दशकांमध्ये अथक प्रयत्नांतून शहराने ही ओळख संपादन केली; परंतु हे शहर सध्या भीषण पाणीसंकटात आहे. यामुळे भरभराटीला आलेला येथील आयटी उद्योग संकटात आहे. जलसंकट प्रामुख्याने वेगाने झालेल्या शहरीकरणात पाणीसाठे आणि स्रोतांचा नाश झाल्याने ओढवले आहे. या संकटामुळे उद्योग इतर ठिकाणी हलविण्याचा विचार करू लागले आहेत.
दिग्गज कंपन्यांची मुख्यालये
येथील आयटी उद्योगातून होणारी उलाढाल २४५ अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. देशभरातून लाखो तरुण रोजगारासाठी या शहरात येतात. जगभरातूनही अनेक कुशल तंत्रज्ञ इथे आयटी व्यवसायामुळे वर्षभर येत असतात.
जगविख्यात गुगल, सिस्को, इंटेल, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, ॲक्सेंचर, डेल, सॅमसंग आदी कंपन्यांसह गोल्डमन सॅक्स, जेपी मॉर्गन यांची मुख्यालये बंगळुरूमध्ये आहेत.
कंपन्यांपुढे काय आव्हाने?
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या अभ्यासानुसार, १९७३ पासून शहरातील पाणीसाठ्याचे क्षेत्रफळ सुमारे ७० % कमी झाले आहे. तलावांवर अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे स्थिती भीषण बनली आहे. कावेरी नदीच्या खोऱ्यातील प्रमुख जलसाठ्यांमध्ये केवळ ३९ टक्के साठा उरला आहे.
कंपन्यांना पाण्याची
गरज मर्यादित ठेवण्यास भाग पाडले जात आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास प्रवृत्त केले आहे. टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रोसह आयटी उद्योगातील प्रमुख कंपन्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन ते पाच दिवस कार्यालयात बोलावतात.
अहमदाबाद, जयपूर, म्हैसूरवर नजर
कंपन्या कमी खर्च, कुशल कामगार, चांगल्या पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक सुविधा यांचा विचार करता कंपन्या अहमदाबाद, जयपूर, म्हैसूर, मदुराई आणि नागपूर यासारख्या शहरांचा
विचार करीत आहेत.
सर्वांत पहिल्यांदा टेक हब म्हणून बंगळुरूला ओळख मिळाली. त्यानंतर दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि पुणे या सहा शहरांमध्येही आयटी उद्योग बहरू लागला.