केवळ देशाच्याच नव्हे, तर जगाच्या आकाशात भरारी घेणारी भारतीय विमान कंपनी जेट एअरवेजची सेवा आर्थिक संकटामुळे बंद झाली आहे. ५ मे रोजी सुरू झालेला जेट एअरवेजच्या वैभवशाली वाटचालीचा दुर्दैवी शेवट सगळ्यांनाच चटका लावणारा आहे. जेटच्या कायमस्वरूपी 'लँडिंग'मुळे तब्बल २२ हजार कर्मचारी एका रात्रीत बेरोजगार झालेत. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं ओझं कसं पेलायचं, असा प्रश्न अनेकांपुढे उभा ठाकलाय. परंतु, आपल्या लाखो प्रवाशांचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून झटलेल्या या कर्मचाऱ्यांचा आधार देण्यासाठी सोशल मीडिया पुढे सरसावला आहे. ट्विटरवर #Letshelpjetstaff हा हॅशटॅग व्हायरल झाला असून अनेक छोटे-मोठे व्यावसायिक जेटची नोकरी गमावलेल्या तरुण-तरुणींना नोकरीची ऑफर देत आहेत. जे झालं ते वाईट असलं, तरी त्यानंतरची माणुसकीची झेप नक्कीच दिलासादायक आहे.
देशात घडणाऱ्या घटनांचे पडसाद, त्यावरच्या प्रतिक्रिया हल्ली लगेच सोशल मीडियावर उमटतात. एखादी मोठी बातमी आली रे आली की, कधी एकदा ट्विट करतो किंवा फेसबुकवर पोस्ट 'पाडतो', असं उत्साही नेटकऱ्यांना होतं. परंतु, या उक्तीला त्याला कृतीची जोड नसल्याची टीका बऱ्याचदा होते. यावेळी मात्र, जेट एअरवेज बंद झाल्याबद्दल फक्त हळहळ व्यक्त न करता, सोशल मीडिया जेट कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. ट्विटरवरून काही उद्योजकांनी जेटच्या कर्मचाऱ्यांना जॉब ऑफर केलेत. जेटइतका पगार आम्ही देऊ शकणार नाही, पण पर्मनन्ट नोकरीची हमी हे व्यावसायिक देत आहेत.
#Letshelpjetstaff Hiring for a a front desk executive/customer support officer in a reputed school in Amritsar. DM me for details.
— Abhinav Thukral (@ThukralAbhinav) April 20, 2019
Hey guys v r looking for a customer support executive for our startup #proximove in Coimbatore. If anyone of you are interested pls reach out #Letshelpjetstaff
— Siddhaarth natarajan (@Siddhaarthan) April 20, 2019
We are hiring. We cannot pay like Jet Airways but can offer you a permanent job at newly opened Fitness Centre in Mumbai #Letshelpjetstaff@jetairways@EconomicTimes@TimesNow@republic
— Parag (@Parag_Prabhu) April 20, 2019
त्याचवेळी, जेटच्या कर्मचाऱ्यांना स्पाईसजेटचे सीएमडी अजय सिंह यांनीही ऑफर दिली आहे. १०० पायलट, २०० हून अधिक केबिन क्रू आणि २०० पेक्षा जास्त टेक्निकल-एअरपोर्ट स्टाफ घेण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.
जेट एअरवेजने अनेकदा प्रवास केलेले केके बुक्सचे मालक के श्रीनिवासमूर्ती यांचं ट्विटही चांगलंच व्हायरल होतंय. फक्त सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी मला या कर्मचाऱ्यांना मदत करायला आवडेल, 'कस्टमर रिलेशन' विभागात दोन कर्मचाऱ्यांना मी संधी देऊ शकतो, असं त्यांनी म्हटलंय.
Happy to offer two JetAirways employees opportunities in Customer Relations in my office... Please DM me for more info Location Chennai
— Cheenu (@ksmkkbookscom) April 19, 2019
पब्लिक रिलेशन क्षेत्रात काम करणाऱ्या अमित प्रभू यांनी, पर्यायी करिअर शोधणाऱ्यांसाठी दहा जागा असल्याचं ट्विट केलंय. रेडिओ मिर्चीला कन्टेंट रायटर आणि रेडिओ जॉकी हवे आहेत, इच्छुक जेट कर्मचारी अर्ज करू शकतात, असं ट्विट प्रोग्रॅमिंग हेड इंदिरा रंगराजन यांनी केलं आहे.
इतरही अनेक व्यावसायिक आपल्याकडे उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांबाबत ट्विटर, फेसबुकवरून माहिती देत आहेत. जेट एअरवेज कर्मचाऱ्यांना ते प्राधान्य देणार आहेत. 'एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ', ही उक्ती या निमित्ताने प्रत्यक्षात येताना दिसतेय. आजच्या काळात ही नक्कीच सुखावणारी बाब आहे.