Join us

अपेक्षांच्या हिंदोळ्यावर बाजाराने घेतली भरारी

By admin | Published: February 22, 2015 11:51 PM

भारतीय बाजारामध्ये गुंतवणूक करण्यामध्ये परकीय वित्तसंस्थांनी कायम ठेवलेला उत्साह, आगामी अर्थसंकल्पामध्ये आर्थिक सुधारणांना चालना मिळण्याची अपेक्षा

प्रसाद गो. जोशीभारतीय बाजारामध्ये गुंतवणूक करण्यामध्ये परकीय वित्तसंस्थांनी कायम ठेवलेला उत्साह, आगामी अर्थसंकल्पामध्ये आर्थिक सुधारणांना चालना मिळण्याची अपेक्षा, चलनवाढीच्या कमी झालेल्या दरामुळे आगामी काळात व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा अशा विविध कारणांनी गतसप्ताह तेजीचा राहिला. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी बाजार काहीसा खाली असला तरी संपूर्ण सप्ताहाचा विचार करता तो तेजीचा दिसून आला.मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक गतसप्ताहात ०.४६ टक्कयांनी म्हणजेच १३६.४८ अंशांनी वाढला. सप्ताहाच्या अखेरीस तो २९१७०.७७ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा त्यामध्ये वाढ झालेली दिसून आली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २८.१० अंशांनी वाढून ८८३३.६० अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये ०.३२ टक्कयांनी वाढ झाली. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये मागील सप्ताहापेक्षा व्यवहारांचे प्रमाण कमी झालेले आढळले. मंगळवारी महाशिवरात्रीमुळे बाजाराला सुटी असल्याने आठवडा लहान झाला. त्यामुळेही व्यवहारांवर काही प्रमाणात परिणाम झालेला दिसून आला.आगामी सप्ताह हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. त्यामध्ये संसदेत सादर होणारा रेल्वे तसेच सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि आर्थिक आढावा जाहीर होईल. त्यामुळे बाजार आता सावधपणाने व्यवहार करीत आहे. त्याचप्रमाणे आगामी सप्ताहात फेब्रुवारी महिन्यातील फ्युचर्स व्यवहारांची सौदापूर्ती असल्याने त्याचेही दडपण बाजारावर येऊ शकते. मोदी सरकारकडून आर्थिक सुधारणांना गती मिळण्याची मोठी अपेक्षा अनेकजण बाळगून आहेत. आगामी अर्थसंकल्पात याबाबतची पावले उचललेली दिसू शकतील. या अपेक्षेनेच गतसप्ताहात बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली.