मुंबई : मालमत्तांमधील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या घसघशीत परताव्याच्या पार्श्वभूमीवर ७१ टक्के श्रीमंत भारतीयांना आता गुंतवणुकीसाठी रिअल इस्टेट मार्केटला पसंती दिल्याची माहिती आयएसआयआर या बांधकाम क्षेत्राशी निगडित कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे.
२०२३ मध्ये मुंबईसह देशातील प्रमुख सात शहरांत लाखो मालमत्तांची खरेदी झाली. यामध्ये सर्वाधिक प्राधान्य हे आलिशान घरांच्या खरेदीला मिळाले होते. त्यामुळे चालू वर्षात तसेच त्यापुढच्या वर्षातही मुंबईसह प्रमुख शहरांतील रिअल इस्टेटमध्ये तेजी दिसेल, असा अंदाज या सर्वेक्षणाद्वारे वर्तविण्यात आला आहे.
सन २०२३ मध्ये जी एकूण घर खरेदी झाली, त्यामध्ये आलिशान घरांचे प्रमाण हे तब्बल ७९ टक्के होते. ज्या घरांची किंमत किमान पाच कोटी किंवा त्यापुढे आहे, अशा घरांना आलिशान घरे असे संबोधले जाते.