नवी दिल्ली : एक हजार कोटी रुपये अथवा त्यापेक्षा जास्त संपत्ती असलेल्या भारतीयांची संख्या २०२१ मध्ये १००७ झाली आहे. ११९ शहरांत राहणाऱ्या या श्रीमंतांत सर्वाधिक लाभ गौतम अदाणी आणि त्यांच्या कुटुंबाला झाला असून, मागील वर्षभरात त्यांचे रोजचे उत्पन्न १००२ कोटी रुपये होते. त्यांची संपत्ती चौपटीने वाढून ५,०५,९०० कोटी रुपये झाली.
हुरुण इंडियाने जारी केलेल्या २०२१ मधील श्रीमंतांच्या यादीत ही माहिती देण्यात आली आहे. गौतम अदाणी हे आता देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ७,१८,००० कोटी रुपयांच्या संपत्तीसह मुकेश अंबानी सलग दहाव्या वर्षी सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. अंबानी हे आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असून, येथेही गौतम अदाणी दुसऱ्या स्थानी आले आहेत. त्यांनी चीनचे बाटलीबंद पाण्याचे उत्पादक झोंग शानशान यांना मागे टाकून दुसऱ्या स्थानी झेप घेतली. गौतम अदाणी यांचे दुबईत राहणारे भाऊ विनोद शांतिलाल अदाणी यांची संपत्ती १,३१,६०० कोटी रुपये असून, श्रीमंतांच्या यादीत ते आठव्या स्थानी आहेत.
शिक्षण क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी बैजूजचे संस्थापक बैजू रवींद्रन यांनी बिग बुल राकेश झुनझुनवाला यांना मागे टाकले आहे. स्टील उत्पादक आर्सेलर, मित्तल समूहाचे लक्ष्मी मित्तल आणि आदित्य बिर्ला समूहाचे कुमारमंगलम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली सर्वाेच्च-१० श्रीमंत भारतीयांच्या यादीत यंदा चार नवे चेहरे दाखल झाले आहेत. कॅलिफोर्नियास्थित व्यावसायिक जय चौधरी यांनीही सर्वोच्च-१० यादीत स्थान पटकावले आहे.
हुरुण इंडियाने जारी केलेल्या अहवालानुसार, १ हजार कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या व्यक्तींची संख्या यंदा १७९ ने वाढून १००७ झाली आहे. १३ जणांची संपत्ती १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. गेल्या वर्षी ही संख्या अवघी ५ होती.
स्मिता व्ही. क्रिष्णा ठरल्या सर्वाधिक श्रीमंत महिलागोदरेज परिवाराच्या तिसऱ्या पिढीतील वारसदार स्मिता व्ही. क्रिष्णा या भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिला ठरल्या आहेत. बायोटेकच्या संस्थापक किरण मुजुमदार-शॉ या स्वनिर्मित सर्वाधिक श्रीमंत महिला आहेत. सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत कॉन्फ्ल्युएंटच्या सहसंस्थापक नेहा नारखेडे (३६) या सर्वाधिक तरुण व्यावसायिक आहेत.