Join us  

श्रीमंतांची संपत्ती ४ वर्षांत दुप्पट; बाजारामुळे कमाईत भर, देशातील १०० जणांकडे ९० लाख कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2024 8:12 AM

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे. यादीत दुसऱ्या स्थानी अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात या वर्षात जोरदार वाढ झाली. या वाढीचा फायदा सर्वसामान्य गुंतवणूकदारांप्रमाणे देशातील सर्वाधिक श्रीमंतांनाही झाला आहे. वर्षभरात बाजार ३० टक्के वाढला असताना, देशातील सर्वाधिक १०० श्रीमंतांजवळील संपत्तीत २०२३ च्या तुलनेत २६.५० लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. सर्वाधिक श्रीमंत १०० व्यक्तींजवळील एकूण संपत्ती या वर्षात पहिल्यांदाच ९० लाख कोटींहून अधिक झाली आहे. 

श्रीमंतांकडील संपत्तीमध्ये यंदा तब्बल ४० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. २०२० मधील आकडेवारीची तुलना केल्यास भारतातील श्रीमंतांकडील संपत्ती दुपटीहून अधिक वाढली आहे.  श्रीमंतांची संपत्ती वाढण्यात त्यांच्या उद्योगातून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा त्यांच्या कंपन्यांच्या वाढलेल्या शेअर्सचा अधिक आहे. 

मुकेश अंबानी देशात सर्वाधिक श्रीमंत 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे. वर्षभरात त्यांची संपत्ती २.३ लाख कोटींनी वाढली. यादीत दुसऱ्या स्थानी असलेले अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्याकडील संपत्तीत ४ लाख कोटींची वाढ झाली आहे.

८० टक्के आणखी श्रीमंत

‘फोर्ब्स’च्या ‘इंडियाज १०० रिचेस्ट २०२४’ या अहवालानुसार भारतातील सर्वाधिक १०० श्रीमंतांच्या यादीतील ८० टक्के जण आधीच्या तुलनेत आणखी श्रीमंत बनले आहेत. या १०० जणांपैकी ५८ जणांच्या संपत्तीत ८,३९७ कोटींनी वाढ झाली आहे.

संपत्ती १० वर्षांत तिप्पट

वर्ष एकूण संपत्ती २०१४      २९.०३ २०१५      २८.९९ २०१६      ३२.०२ २०१७      ४०.२२ २०१८      ४१.३२ २०१९     ३७.९८ २०२०      ४३.४५ २०२१     ६५.०८ २०२२      ६७.१६ २०२३      ६७.१२ २०२४      ९३.६४ 

(स्रोत : फोर्ब्स, संपत्ती लाख कोटी रुपयांत) 

 

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सगौतम अदानीअदानी