मुंबई : कोरोनाच्या साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅँक सज्ज असून, आमच्याकडील अस्त्रे अद्याप संपलेली नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे.
एका वेबिनारमध्ये बोलताना दास यांनी वरील माहिती दिली. रिझर्व्ह बॅँकेने याआधी व्याजदर कमी केले. मात्र या महिन्यामध्ये त्यामध्ये कपात केली गेली नाही. याचा अर्थ आमच्याकडील अस्रे संपली असा होत नसल्याचे दास यांनी स्पष्ट केले. अर्थव्यवस्थेवर आलेल्या या मोठ्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी रिझर्व्ह बॅँकेकडे केवळ व्याजदर कपात एवढेच हत्यार नाही, अन्य आयुधेही आमच्याकडे आहेत. योग्य वेळ येताच त्यांचा वापर करून अर्थव्यवस्था सावरली जाईल, असेही दास यांनी स्पष्ट केले. बॅँकेने दोन वेळेला व्याजदरामध्ये कपात केल्यानंतरही महागाई वाढली आहे. मात्र त्यावर काबू मिळविला जाईल.
चौकस बनणे गरजेचे
होणारे घोटाळे लवकर लक्षात यावेत, यासाठी बॅँकांनी अधिक सक्षम व्यवस्था उभारून चौकस बनणे गरजेचे असल्याचे दास यांनी सांगितले. देशातील बॅँकिंग प्रणाली ही स्थिर असून तिला कोणताही धोका नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.