पगाराचे दिवस आहेत. महिन्याची १ तारीख ते सात तारखेपर्यंत बहुतांश कंपन्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार वळता करतात. हा पगार कधी येतो, आणि कसा संपतो, हे अनेकांना समजतही नाही. मग सुरु होते ती काटकरस आणि पुन्हा पगार होण्याची वाट पाहणे. परंतू देशातील B2B ई-कॉमर्स कंपनी IndiaMART ने आपल्या कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीने दर आठवड्याला पगार देण्याची पॉलिसी (Weekly Salary Pay Policy) जाहीर केली आहे. कंपनीने फेसबुक पेजवर याची माहिती दिली आहे. कंपनीनुसार यामुळे कर्मचाऱ्यांवरील आर्थिक ओझे कमी होईल आणि ते आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा घेतील.
एक लवचिक कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी आणि आमच्या कर्मचार्यांचे आर्थिक कल्याण सुनिश्चित करण्यासाठी दर आठवड्याला वेतन देण्याचे धोरण स्वीकारणारी IndiaMART ही भारतातील पहिली कंपनी बनली आहे, असे IndiaMART ने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. दर आठवड्याला पगार मिळण्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने या पोस्टसोबत एक फोटोही पोस्ट केला आहे. फोटोमध्ये लिहिले आहे, "तुमचे आर्थिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी उचललेले पाऊल."
अनेक देशांत असाच पगार दिला जातो...
दर आठवड्याला पगार करण्याची ही संकल्पना कर्मचार्यांच्या निरोगीपणाला चालना देण्यासाठी एक पाऊल असल्याचे म्हटले जाते. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग आणि यूएसमध्ये हे आधीपासून लागू आहे. भारतात आत्तापर्यंतच्या सामान्य पद्धतीनुसार कर्मचाऱ्यांना महिन्याच्या शेवटी पगार मिळतो.