नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याजदर कपातीचे उद्योग जगताने स्वागत केले असून ही कपात आर्थिक वृद्धीला फायदेशीर आहे. बँकांनी या कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, म्हणजे मागणी वाढून गुंतवणुकीचे चक्र आणखी गतिमान होईल, असे म्हटले आहे.‘सीसीआय’चे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी म्हणाले की, आर्थिक घडामोडींमधील मंदी रिझर्व्ह बँकेने समजावून घेतली. ही समाधानाची बाब आहे. रिझर्व्ह बँकेच्या आजच्या निर्णयाने कर्ज घेण्याबाबत उद्योग जगतासमोर असलेली द्विधा मन:स्थिती बऱ्याच प्रमाणात कमी होईल. गुंतवणूक आणि वृद्धीला चालना देण्यासाठी कॉर्पोरेट जगत आता चांगल्या स्थितीत आहे.‘असोचेम’चे महासचिव डी.एस. रावत म्हणाले की, एवढी मोठी व्याजदर कपात आम्हाला चकित करणारी आनंददायी बाब आहे. गव्हर्नर रघुराम राजन यांनी एक प्रकारे दिवाळीचा बोनस दिला आहे. यंदा जानेवारीपासून आतापर्यंत १.२५ टक्के दरकपात करण्यात आली आहे. आता चेंडू बँकांच्या मैदानात आहे. त्यांनी आता पुढाकार घेतला पाहिजे.‘येस’ बँकेचे प्रबंध संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर म्हणाले की, चलनवाढीतील नरमी आणि वृद्धीदर घटण्याचा अंदाज आला असताना रिझर्व्ह बँकेच्या या पावलाने धोरणात्मक सुधारणा मजबूत होतील.गुंतवणुकीमुळे रोजगारात वाढ होईल. मुडीज इन्व्हेस्ट सर्व्हिसेसचे सहायक प्रबंध संचालक अत्सी सेठ म्हणाले की, रिझर्व्ह बँकेचे आता वृद्धीदराकडे लक्ष असल्याचे दिसते. पीएचडी चेंबरचे अध्यक्ष आलोक बी. श्रीराम म्हणाले की, औद्योगिक वृद्धीला प्रोत्साहन आणि आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यातदारांना अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी हे सकारात्मक पाऊल आहे. निर्यातदारांची संघटना ‘फियो’चे अध्यक्ष एस.सी. रल्हन म्हणाले की, निर्यातीच्या सर्व क्षेत्रात व्याज सहायता योजना तात्काळ पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे.
व्याजदर कपातीचे उद्योग जगताकडून स्वागत
By admin | Published: September 29, 2015 10:55 PM