सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : देश-विदेशातील गुंतवणूक वाढविण्यासाठी झालेले ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये एकट्या पश्चिम महाराष्ट्रात विविध एक हजार ३७० कंपन्यांनी तब्बल ३७ हजार ५४५ कोटींची गुंतवणूक करण्याचे सामंजस्य करार करण्यात आले. यापैकी गेल्या पाच वर्षांत ६०२ म्हणजे पन्नास टक्के कंपन्यांनी प्रत्यक्ष गुंतवणूक केली. त्यांचे उत्पादन सुरू झाले आहे.
यामध्ये ३७४ कंपन्यांनी केवळ जमिनी ताब्यात घेतल्या असून, उत्पादन सुरू करण्यासाठी पुढे कोणतीच हालचाल केली नाही, तर १४९ कंपन्यांनी करार झाला असला तरी महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नसल्याचे सांगत आपला गाशा गुंडाळला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले आहेत. राज्यात गुंतवणूक करण्यासाठी कंपन्यांकडून करार केले जातात;
परंतु प्रत्यक्ष किती कंपन्या गुंतवणूक करतात याबाबत ‘लोकमत’च्या वतीने आकडेवारीसह आढावा घेण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्रातील चित्र
मेक इन इंडिया (२०१६)
८६० कंपन्यांसोबत सामंजस्य करार
१२ हजार ८७५ कोटींची गुंतवणूक अपेक्षित
६५ हजार ४५१ रोजगारनिर्मितीची हमी
प्रत्यक्षात ४१० मोठे व लघु उद्योग सुरू
मॅग्नेटिक महाराष्ट्र (२०१८)
५१० कंपन्यांसोबत सामंजस्य करार
२४ हजार ६७० कोटींची गुंतवणूक अपेक्षित
१ लाख ४१ हजार ७२५ रोजगारनिर्मितीची हमी
प्रत्यक्षात १९२ मोठे व लघु उद्योग सुरू