नवी दिल्लीः रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये ०.७५ टक्क्यांची कपात केलेली असून, रेपो रेट ५.१५ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो रेटमध्ये ०.९० टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे रिव्हर्स रेपो रेट ४.९० टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला आहे. बऱ्याचदा रेपो दर आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय हा प्रश्न पडतो. त्याचा सामान्यांना कसा फायदा होणार याचंही कोडं अनेकांना उलगडत नाही. रेपो रेट म्हणजे बॅंका रिझर्व्ह बँकांकडून पैसे घेतात तो दर, रेपो रेट वाढणे आणि कमी होणे याचा थेट परिणाम बँकांना आरबीआयकडून होणाऱ्या पैशांवर होत असतो.
आरबीआयकडून बँकांना कमी दरात पैसे उपलब्ध झाले, तर साहजिकच बॅंकाही आपल्या ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देऊ शकतात. रेपो रेट कमी झाल्याने त्याचा फायदा गृह आणि वाहन कर्जदारांना होणार असून, आरबीआयकडून बॅंकावर व्याजदर कमी करण्यासाठी दबाव येऊ शकतो. फेब्रुवारी महिन्यात आरबीआयकडून पाव टक्क्यांनी रेपो रेट कमी केला होता, पण त्यावेळी बॅकांनी व्याजदरात कुठलीही कपात केली नाही, आता पुन्हा एकदा रेपो रेट कमी केल्याने बँका व्याजदरात कपात करू शकतील. गृह कर्ज आणि वाहन कर्जावरील व्याजदर कमी झाल्यामुळे ग्राहकांना महिन्याला भरावा लागणारा EMI देखील कमी होण्यास मदत मिळेल.
रेपो रेट म्हणजे काय?
बँकांची मोठ्या रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो, तोच रेपो रेट. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्जं देतात. परंतु, हे दर वाढले तर बँकांचं कर्जही महाग होतं आणि त्याचा फटका ग्राहकांना बसतो.
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
बँकांकडे शिल्लक राहिलेली रक्कम बँका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. त्या रकमेवर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. हा रिव्हर्स रेपो रेट बाजारातली पैशांची तरलता म्हणजे लिक्विडिटी नियंत्रित करण्याचं काम करतो. जेव्हा बाजारात जास्त लिक्विडिटी असते तेव्हा रिझर्व्ह बँक रिव्हर्स रेपो रेट वाढवते, त्यामुळे जास्तीत जास्त व्याज मिळवण्यासाठी बँका स्वतःच्या रकमा रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. परिणामी बाजारातल्या पैशांची तरलता कमी होते.
रेपो रेट कमी केल्याने काय आणि कसा होणार फायदा; जाणून घ्या...
रेपो रेट म्हणजे बॅंका रिझर्व्ह बँकांकडून पैसे घेते तो दर, रेपो रेट वाढणे आणि कमी होणे याचा थेट परिणाम बँकांना आरबीआयकडून होणाऱ्या पैशांवर होत असतो.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 11:55 AM2020-03-27T11:55:08+5:302020-03-27T12:10:52+5:30