Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात मालामाल होणे म्हणजे नेमके काय?

शेअर बाजारात मालामाल होणे म्हणजे नेमके काय?

शेअर बाजारात खरोखरच पैसे बुडतात कसे? गुंतवणूकदार मालामाल नेमके कसे होतात?

By पुष्कर कुलकर्णी | Published: August 20, 2023 08:00 AM2023-08-20T08:00:44+5:302023-08-20T08:01:09+5:30

शेअर बाजारात खरोखरच पैसे बुडतात कसे? गुंतवणूकदार मालामाल नेमके कसे होतात?

What exactly does it mean to get rich in the stock market? | शेअर बाजारात मालामाल होणे म्हणजे नेमके काय?

शेअर बाजारात मालामाल होणे म्हणजे नेमके काय?

डॉ. पुष्कर कुलकर्णी, शेअर बाजार विश्लेषक

आपण बातम्या वाचतो की, ‘गुंतवणूकदारांनी गमावले एक लाख कोटी’, ‘गुंतवणूकदार दोन लाख कोटींनी मालामाल.’  सामान्य गुंतवणूकदारांना नेहमी प्रश्न पडतो की, शेअर बाजारातील हे नुकसान किंवा फायदा नेमका कसा होत असतो? या प्रश्नाचे उत्तर समजेल अशा सोप्या भाषेत उदाहरणांसह जाणून घ्या.

शेअर बाजारात खरोखरच पैसे बुडतात कसे? गुंतवणूकदार मालामाल नेमके कसे होतात?

सचिन (उदाहरणासाठी घेतलेले नाव) हा एक  गुंतवणूकदार आणि ट्रेडर आहे. शेअर बाजारात सचिन तीन प्रकारचे व्यवहार करतो. डिलिव्हरी, इंट्रा डे आणि ऑप्शन्स.

‘इंट्रा डे ट्रेड’मध्ये सचिनने ‘बजाज फिनसर्व’चे ५०० शेअर्स १,४७२ रुपये याप्रमाणे विकले आणि १,४६९ रुपयांत पुन्हा खरेदी केले आणि ‘इंट्रा डे’ व्यवहार सेटल करून ट्रेड पोझिशन बंद केली. या व्यवहारात सचिनने प्रतिशेअर ३ रुपये कमविले. म्हणजेच एकूण दीड हजार मिळविले.

सचिनकडे ‘बजाज फिनसर्व’चेच एकूण १५० शेअर्स आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याने हे शेअर्स १,३०० रुपये प्रतिशेअर या भावाने  डिलिव्हरी ट्रेड करून खरेदी करून ठेवले होते. मागील शुक्रवारी बाजार सुरू होताना हा शेअर १,४७० रुपयांनी ओपन झाला आणि बाजार बंद होताना त्याचा भाव १,४६० रुपये होता. म्हणजेच सचिनची या शेअरमध्ये मूळ गुंतवणूक रक्कम होती १ लाख ९५ हजार रुपये. बाजार सुरू होताना याचे मूल्य होते २ लाख २० हजार ५०० रुपये. बाजार बंद होताना हेच मूल्य झाले २ लाख १९ हजार रुपये. म्हणजेच गुंतवणूक रक्कम दीड हजार रुपयांनी कमी झाली. याचा अर्थ सचिनचे दीड हजार रुपयांचे प्रत्यक्ष नुकसान झाले का? उत्तर नाही असे आहे. कारण ही कमी झालेली रक्कम कागदावर कमी झाली आहे. भाव खाली आल्याने जरी नुकसान असले तरी ते प्रत्यक्षात झालेले नुकसान नाही. त्यामुळे सचिनला शुक्रवारी दीड हजाराला चुना लागला, किंवा त्याने ते गमावले असे नसून हे नुकसान फक्त नोशनल म्हणजेच कागदावरचे आहे. जेव्हा बाजार पुन्हा वर येईल आणि जेव्हा त्याच शेअरचा भाव पुन्हा वाढलेला असेल तेव्हा सचिनचा झालेला नोशनल तोटा भरून निघेल आणि याचे रूपांतर नोशनल फायद्यात होईल. आता जर पुढील महिन्यात या शेअरची किंमत वाढून १,५०० रुपये झाली  तर त्याची मालमत्ता एकूण ३० हजारांनी वाढलेली असेल. आता गुंतवणूकदार मालामाल होतात, असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा त्यांच्या मालमत्तेचे नक्त मूल्य वाढलेले असते. म्हणून ते मालामाल होत असतात. जेव्हा सचिन त्याच्याकडील शेअर १,५०० रुपये या भावात विकेल तेव्हा त्याला प्रत्यक्ष ३० हजारांचा फायदा होईल. (खरेदी आणि विक्री भाव यातील फरक) यालाच प्रॉफिट बुकिंग असे म्हणतात. अशा व्यवहारात सचिन प्रत्यक्ष ३० हजारांनी मालामाल झाला, असे म्हणता येईल.

सचिन ऑप्शन्समध्येही व्यवहार करतो. त्याने ‘बजाज फिनसर्व’चा कॉल ऑप्शन घेऊन ठेवला होता. भाव वाढेल या अपेक्षेने; मात्र प्रत्यक्षात भाव खाली खाली येत आहेत, असे समजताच त्याने कॉल ऑप्शन सेटल करून त्या व्यवहारात ८०० रुपये गमाविले. म्हणजेच प्रत्यक्ष तोटा सहन करून तो बाहेर पडला.

या तीनही उदाहरणांत सचिनला ‘इंट्रा डे’मध्ये  प्रत्यक्ष फायदा, ‘ऑप्शन ट्रेड’मध्ये तोटा कसा झाला, हे पाहिले आणि त्याच्याकडे डिलिव्हरी असलेल्या  शेअर्समधून त्याची नक्त मालमत्ता वर-खाली कशी झाली, तेही पाहिले. सचिनसारखे लाखो-कोट्यवधी गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स बाजारात रोज व्यवहार करीत असतात. याचे रोजचे एकत्रित मूल्य काही लाख कोटींच्या घरात जाते. यामुळे आपल्याकडे असलेला शेअर तोट्यात  विकला तर प्रत्यक्ष नुकसान आणि  फायद्यात विकला तर प्रत्यक्ष फायदा. हे गणित समजण्यास इतके सोपे आहे.

Web Title: What exactly does it mean to get rich in the stock market?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.